कासावली ते पणजीपर्यंत मोटरसायकल रॅली : काँग्रेस, आप, आरजी, एनजीओंचाही सहभाग
प्रतिनिधी /पणजी
पर्यटन खात्याने जारी केलेल्या जेटी धोरणाच्या मसुद्याला काँग्रेस, आप, आरजी तसेच काही बिगर सरकारी संस्थांनी विरोध दर्शविला आहे. या धोरणामुळे गोवा संपुष्टात येणार असल्याने कासावली ते पणजीपर्यंत मोटरसायकल रॅली काढण्यात आली आणि येथील आझाद मैदानावर या मसुद्याची होळी करण्यात आली. केवळ जेटी धोरण नको, तर लोकांना आणि विशेषतः मच्छीमार व शेतकऱयांना विश्वासात घेऊन ‘पर्यटन जेटी धोरण’ या नावाने तयार करावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्यासह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, आरजीचे आमदार विरेश बोरकर, आपचे आमदार क्रूझ सिल्वा, आमदार व्हेन्जी व्हिएगस तसेच अन्य लोक मिळून सुमारे दोनशेजण अझाद मैदानावर होते.
जेटी धोरण परप्रांतीय धनाडय़ांसाठीच
जेटी धोरण हे गोमंतकीयांच्या हितासाठी नव्हे तर परप्रांतीय धनाडय़ांसाठी आहे. कोळसा वाहतूक करण्याच्या उद्देशाने ते करण्यात आले आहे. भाजपचे केंद्रातील नेते जसा आदेश देतात त्याच तालावर गोवा सरकार नाचत असून गोवा संपवण्याच विचार करीत आहे, अशी टीका युरी आलेमाव यांनी केली.
हे धोरण गोव्याचे कोळसा हबमध्ये आणि जुगाराच्या अड्डय़ात रूपांतर करेल. भाजप सरकारचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी प्रथम सुमारे 5 कोटी खर्च करुन तयार केलेल्या ‘कॉपी पेस्ट’ गोवा पर्यटन धोरण आणि ‘मास्टर प्लॅनचे’ पुनरावलोकन करावे. कॅप्टन ऑफ पोर्टस्ला जेटी धोरण हाताळू द्या, असेही आलेमाव म्हणाले.
शेतकरी, मच्छीमारांवर होणार मोठा परिणाम
जेटी धोरणामुळे शेतकरी तसेच मच्छीमार बांधवांवर मोठा परिणाम होणार आहे. सरकार पर्यटनाच्या नावाखाली कोळसा वाहतूक करण्यासाठी जेटी धोरण राबविण्याचा प्रयत्न करीत आहे, असे आमदार विरेश बोरकर यांनी सांगितले.
प्रदेश काँग्रेस अध्यक्ष पाटकर यांचाही सहभाग
काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी गोव्यातील नद्या वाचविण्यासाठी सरकारच्या जेटी धोरणाला विरोध करणारऱया ‘मोटरसायकल रॅलीत भाग घेतला. ‘गोव्याच्या नद्या वाचवा’ अशा जोरदार घोषणा देत शेकडो दुचाकीस्वारांसह शिरोडा ते पणजी असा प्रवास काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केला.
सासष्टीतील कासावली येथून ही मोटरसायकल रॅली सुरु झाली होती. रॅलीसाठी जाणाऱया काहींना पोलिसांनी वाटेतच अडवून माघारी फिरविले. आझाद मैदानावरही कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.









