वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सिमेंटच्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणारी जेके सिमेंट आता रंग उत्पादनामध्ये उतरणार असल्याचे समजते. सदरच्या व्यवसायामध्ये उतरण्यासाठी कंपनीने 600 कोटींची गुंतवणूक करण्याचे निश्चित केले आहे.
भारतातील रंग उत्पादक कंपन्यांमध्ये स्पर्धा करण्यासाठी आणखी एका कंपनीची भर आता पडणार आहे. रंग उत्पादनासह विक्री, विपणन, व्यवसाय, आयात आणि निर्यात या सर्व बाबी कंपनी येत्या काळामध्ये हाताळणार आहे.
रंग उत्पादनाच्या व्यवसायामध्ये उतरण्यासाठीच्या ठरावाला संचालक मंडळाने घेतलेल्या बैठकीमध्ये परवानगी दिली आहे. यासोबतच संचालक मंडळाने 600 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला परवानगी दिली आहे. सदरची गुंतवणूक ही पुढील पाच वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. एशियन पेंट्स, बर्जर पेंट्स आणि नेरोलॅक पेंट यांच्यासोबत आता जेके सिमेंटची स्पर्धा रंग उत्पादनाच्या व्यवसायामध्ये दिसणार आहे.









