बेशिस्त पार्किंगमुळे होतेय वाहतुकीची कोंडी
प्रतिनिधी / बेळगाव
न्यायालयाच्या आवारात पुन्हा वाहनांची गर्दी वाढू लागली आहे. दुचाकी आणि चार चाकी वाहने वाढत असल्यामुळे पार्किंग समस्या गंभीर बनत चालली आहे. पक्षकारांनी आणि वकिलांनी तसेच इतर नागरिकांनी वाहन पार्किंग करताना दक्षता घेणे गरजेचे आहे. कारण रस्त्यावरच पार्किंग होत असल्यामुळे इतर वाहनांना त्याचा त्रास होत आहे. तेव्हा दुचाकी व चार चाकी वाहनचालकांनी पार्किंग शिस्तीने करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोरोनामुळे न्यायालयाचे कामकाज तब्बल वर्षभर ठप्प झाले होते. मात्र, आता न्यायालयीन कामकाजाला गती आली असून न्यायालयात मोठी गर्दी होताना दिसत आहे. न्यायालयाच्या आवारात पार्किंग करण्यासाठी जागा असली तरी त्याचा योग्य प्रकारे विनियोग होत नसल्याचे पहिल्यापासूनच दिसून येत आहे. घाईगडबडीत अनेक वाहनचालक बेजबाबदारपणे वाहने पार्किंग करत आहेत. त्यामुळे इतर वाहनधारकांना त्याचा त्रास होत आहे. बऱयाच वेळा वकिलांना व पक्षकारांना ये-जा करणेही अवघड जात आहे. तेव्हा पार्किंगची शिस्त आता पक्षकारांनी पाळणे महत्त्वाचे झाले आहे. बार असोसिएशननेही याकडे लक्ष पुरवावे, अशी मागणी होत आहे.









