ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
5 जानेवारी रोजी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हिंसाचार प्रकरणात आज दिल्ली कोर्टाने सुनावणी केली. कोर्टाने व्हॉट्सऍप, गुगल व ऍपलसह दिल्ली पोलीस आणि राज्य सरकारला नोटीस बजावली आहे.
तीन प्राध्यापकांनी उच्च न्यायालयाला अपील केली होती की, हिंसेचे सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्याचे निर्देश द्यावेत. यावर कोर्टाने पोलिस, दिल्ली सरकार, व्हॉट्सऍप, ऍपल आणि गूगलकडून मंगळवारी दुपारी 3 वाजेपर्यंत उत्तर मागितले आहे.
सुनावणी दरम्यान दिल्ली पोलिसांनी सांगितले की, आतापर्यंत जेएनयू प्रशासनाकडून हिंसेचे फुटेज सुरक्षित ठेवण्याबाबत प्रतिसाद मिळाला नाही. व्हॉट्सऍपला लिखित स्वरुपात विनंती करून हिंसेशी संबंधित मेसेज करणारे ‘युनिटी अगेंन्ट लेफ्ट’ आणि ‘फ्रेंड्स ऑफ आरएसएस’ या ग्रुपचा डेटा सुरक्षित ठेवण्यास सांगितले आहे.