प्रतिनिधी/ मंडणगड
मंडणगडच्या जयेश भगवान बागुल याने 2021 साठी नुकत्याच झालेल्या जेईई मेन परीक्षेत 99.73 पर्सेंटाईल मिळवत गणित विषयात 100 पैकी 100 गुण मिळवून संपूर्ण भारतात प्रथम येण्याचा मान पटकावला.
धुळे जिह्यामधील शिंदखेडा तालुक्यातील पढावद गावचे मूळ रहिवासी असलेले भगवान बागुल हे अनेक वर्षांपासून मंडणगड तालुक्यात प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा लहान मुलगा जयेश कोटा राजस्थान याठिकाणी सध्या महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. त्याने मंडणगड तालुक्यातील दुर्गम भागात प्राथमिक शिक्षण घेतले. बौद्धीक क्षमतेच्या जोरावर नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवला. अतिशय हुशार असणाऱया जयेशने जेईईमार्फत उच्च दर्जाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेण्याचे स्वप्न पाहिले. ते सत्यात उतरवण्यासाठी आपले संपूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रीत केले आहे. जयेशच्या या यशामध्ये त्याच्या प्रत्येक टप्प्यावरील शिक्षक, मोठा भाऊ प्रथमेश याचे मार्गदर्शन व आई-वडिलांनी घेतलेले कष्ट व सहकार्य मोलाचे असल्याचे जयेश सांगतो.







