नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जेईई मेन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) याची घोषणा केली आहे. परीक्षेची सुधारित तारीख नंतर जाहीर केली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
फेबुवारी आणि मार्चमध्ये पहिल्या दोन सत्रातील परीक्षा पूर्ण झालेल्या असून, एप्रिलच्या सत्रात घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 27, 28 आणि 30 एप्रिल रोजी ही परीक्षा होणार होती. परीक्षेसाठी सुधारित तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे. सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी किमान पंधरवडय़ाचा वेळ उपलब्ध करून दिला जाणार आहे. परीक्षेच्या 15 दिवस आधी ही तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचे नॅशनल टेस्टिंग एजन्सीने निवेदनात स्पष्ट केले आहे.
कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून देशातील शैक्षणिक वेळापत्रक कोलमडले आहे. गेल्यावषी अनेक परीक्षा उशिराने घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर यंदाही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या संकटात विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घेऊन परीक्षा रद्द वा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्याकडे राज्य-केंद्र सरकारचा कल दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला, तर बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर आता जेईई मेनची परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.









