केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचे संकेत : वर्षातून दोनदा परीक्षा घेण्याचाही विचार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशातील कोरोना स्थितीमुळे शालेय परीक्षांचा तिढा अजूनही कायम आहे. जेईई आणि नीट यासारख्या महत्त्वपूर्ण परीक्षांबाबतही अजून निर्णय न झाल्याने विद्यार्थी आणि पालकवर्ग संभ्रमात आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी गुरुवारी विद्यार्थी आणि पालकांना ‘लाईव्ह’ प्रक्षेपणाद्वारे संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी नीट, जेईई सारख्या परीक्षा लांबणीवर पडण्याचे संकेत दिले. तसेच वर्षातून दोनवेळा परीक्षा घेण्याचा पर्यायही विचाराधीन असल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर सद्यःस्थितीत अभ्यासक्रमात काही प्रमाणात कपात करणार असल्याचेही सांगितले.
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी गुरुवारी ‘लाईव्ह’ प्रक्षेपणाद्वारे विद्यार्थी व पालकांना बोर्ड व स्पर्धा परीक्षांबाबत आवश्यक माहिती दिली. कोरोना संसर्गाच्या परिस्थितीवर नियंत्रण आले नाही तर एनईईटी (नीट) आणि जेईई मेन 2021 च्या परीक्षा यावर्षी पुढे ढकलल्या जाऊ शकतात, असे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले. नीट, जेईई परीक्षा वर्षातून दोनदा घेण्यावर सरकार विचार करीत असून राज्यांशी बोलल्यानंतर लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल. तसेच कोरोना संसर्गामुळे शैक्षणिक वर्षातील बरेच दिवस वाया गेल्याने यंदाच्या परीक्षेसाठी अभ्यासक्रमही 10 ते 20 टक्के कमी करणार असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या सूचना लक्षात घेऊन त्यांचे शंकानिरसनही त्यांनी केले.
सीबीएसई परीक्षेबाबतही स्पष्टीकरण
प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम ठरविण्यापूर्वी शिक्षण विभागाला सर्व राज्य शिक्षण मंडळांशी बोलण्याचे निर्देश शिक्षणमंत्र्यांनी दिले आहेत. सीबीएसई बोर्ड परीक्षा 2021 च्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बोलताना विद्यार्थ्यांना परीक्षेच्या नव्या पॅटर्ननुसार तयारीसाठी पुरेसा वेळ दिला जाईल आणि कोरोना संक्रमणाची परिस्थिती विचारात घेतल्यानंतरच परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या जातील, असे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.









