वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अभियांत्रिकी प्रवेशासाठीची जेईई परीक्षा मंगळवार दि. 1 ते 6 सप्टेंबरअखेर होत आहे. तथापि ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी अजूनही पुढे केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर एनटीएने या परीक्षेचे वेळापत्रक आणि हॉल तिकीटही त्यांच्या वेबसाईटवर जारी केले आहे.
दरम्यान, भाजपचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनीही पंतप्रधान मोदी यांच्याकडे स्वतः या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. या परीक्षा दिवाळीनंतर घेण्यात याव्यात, अशीही मागणी केली असल्याचे सुब्रह्मण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांकडून तसा निरोप आल्यास आपण विद्यार्थ्यांना कळवू, असेही स्वामी यांनी म्हटले आहे. तर अनेक राज्यांतूनही पंतप्रधानांना साकडे घातले जात आहे. तथापि परीक्षा घेण्याची सर्व तयारी पूर्ण करण्यात आल्याचे एनटीएने स्पष्ट केले आहे. त्यामुळे मंगळवार दि. 1 पासून या परीक्षा होणारच आहेत.









