जॅकोब मॅथ्यू. विद्यादानासाठी म्हणून केरळहून गोव्यात आले. गोव्याशी त्यांची नाळ जुळलेली असून ते गोंयकारच बनले आहेत. त्यांचा आदर्श गिरवून अन्य शिक्षकांनीही गोव्यासाठी विधायक कार्य करावे जेणेकरून त्यांना गोमंतकीय कायम स्मरणात ठेवतील.
गोवा मुक्तीनंतर गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांनी शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवली. त्याकाळी गोव्यात कुशल मनुष्यबळ नव्हते. उच्च शिक्षितांचा अभाव होता. त्यामुळे बांदोडकरांनी अन्य राज्यांमधील विद्यादानासाठी शिक्षक भरती केले तसेच अभियांत्रिकी म्हणा किंवा अन्य क्षेत्रातही परराज्यातील उमेदवारांची भरती करण्यात आली. त्यातील एक व्यक्तिमत्त्व म्हणजे जॅकोब मॅथ्यू. विद्यादानासाठी म्हणून केरळहून गोव्यात आले व त्यांचाही शैक्षणिक विकासात मोठा वाटा आहे, असे म्हणावे लागेल. गोव्याशी त्यांची नाळ जुळलेली असून ते गोंयकारच बनले आहेत. त्यांचा आदर्श गिरवून अन्य शिक्षकांनीही गोव्यासाठी विधायक कार्य करावे जेणेकरून त्यांना गोमंतकीय कायम स्मरणात ठेवतील.
सध्या वयाची 72 वर्षे गाठणारे जॅकोब मॅथ्यू यांचे ‘जर्नी ऑफ माय लाईफ ऍण्ड द टूथ फाऊंड’ हे आत्मचरित्रपर इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. या इंग्रजी पुस्तकात त्यांनी बालपणीच्या आठवणी, शालेय शिक्षण, कॉलेजचे दिवस व युवावस्थेतील घडामोडी, पहिली नोकरी, गोव्यातील जीवन, कौटुंबिक जीवन, पालये-पेडणे येथील श्री भूमिका इंग्लिश स्कूल वाचविण्यासाठी संघर्ष, इंडियन स्टुंडट एज्युकेशनल ऍण्ड फाऊंडेशन व रुडॉल्फ सवार्ट (जर्मनी) यांच्या सहयोगाने शैक्षणिक कार्य व झालेला नवीन प्रतिमेचा उदय, आपली ओळख व लाभलेली पावती, मान्यवरांकडून सत्कार, अनुभवलेले सत्य आदी घटना क्रमवार मांडलेल्या आहेत.
जॅकोब मॅथ्यू यांना गोव्यात आणण्यात युनिव्हर्सल एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक ए. के. मॅथ्यू यांचा वाटा आहे. पेडणे तालुक्यातील पालये गावातील श्री भूमिका इंग्लिश स्कूलही त्यांच्या ताब्यात त्यांनी दिले. आयुष्याच्या दुसऱया टप्प्यावर इंडियन स्टुडंट एज्युकेशनल ऍण्ड फाऊंडेशनचे संस्थापक जर्मन नागरिक रुडॉल्फ सवार्ट यांनी त्यांना गोव्यात खासगी तांत्रिक स्कूल चालविण्यासाठी मोकळा हात दिला. त्यांचे बालपणीचे मित्र के. एल. मॅथ्यू यांनी त्यांना हे आत्मचरित्र लिहिण्यासाठी प्रवृत्त केले व त्यांनीच हे पुस्तक संपादित केले. संगणक शिक्षक डॅनियल सिल्वेरा यांनी पुस्तकाचे सुंदर मुखपृष्ठ बनवले आहे. म्हापसा येथील सेंट ब्रिटो हायस्कूलचे चेअरमन रेव्ह. फादर अब्राहम पेनुमकल एस. जे यांची या पुस्तकाला प्रस्तावना लाभली आहे. पेडणे तालुक्यातील दुर्गम अशा पालये गावातील श्री भूमिका इंग्लिश स्कूलचे (इयत्ता पाचवी ते सातवी) मुख्याध्यापक म्हणून त्यांनी आपली कारकिर्द सुरू केली. स्थानिक भाषेची अडचण, धड इमारत नाही, शाळेचे मैदान नाही अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यावेळी त्यांनी हे स्कूल चालवले. आता जुन्या इमारतीच्या जागी तीन मजली भव्य इमारत, व्यावसायिक शिक्षणाचे वर्ग, खेळाचे मैदान, संरक्षक भिंत, मुलांसाठी पार्क अशी सुविधायुक्त इमारत उभी राहिली आहे. याचे श्रेय जॅकोब मॅथ्यू यांना द्यावे लागेल. बरीच मेहनत आणि धैर्याने पालये गावातील लोकांची मने जिंकण्यात ते यशस्वी झाले आहेत. 1991 साली जर्मनीहून गोव्यात पर्यटक म्हणून आलेले रुडॉल्फ सवार्ट यांचा जॅकोब मॅथ्यू यांच्याशी संपर्क आला. त्यावेळी सवार्ट यांनी गोव्यातील काही विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती बघितली. अनेक विद्यार्थी आवश्यक आर्थिक सहाय्याअभावी आपले शिक्षण पूर्ण करू शकत नसल्याचे त्यांना आढळून आले. त्यांच्या सहाय्यासाठी त्यांनी जॅकोब मॅथ्यू यांच्या सहकार्याने या गरजू, गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केल्या. अनेक विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तींच्या जोरावर आपले उच्च शिक्षण पूर्ण केलेले आहे. काही उच्च पदावर आहेत. सवार्ट यांनी जॅकोब मॅथ्यू यांच्या साहाय्याने विद्यार्थ्यांच्या हितासाठी इंडियन स्टुडंट एज्युकेशनल ऍण्ड फाऊंडेशन ही संस्थाही स्थापन करून अनेक विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांची दालने खुली करून दिली. अनेक ड्रॉपआऊट विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण देऊन त्यांना रोजगार प्राप्त करून दिला आहे तर काहींनी स्वतंत्र व्यवसाय सुरू केला आहे. या विद्यार्थ्यांसाठी खऱया अर्थाने रुडॉल्फ सवार्ट व जॅकोब मॅथ्यू एक देवदूतच ठरलेले आहेत.
जॅकोब मॅथ्यू यांनी शाळेच्या मुख्याध्यापकदावरून स्वेच्छा निवृत्ती स्वीकारून फाऊंडेशनचे पूर्णवेळ कार्य करीत आहेत. या संस्थेच्या भूमिका प्रायव्हेट आयटीआय पालये-पेडणे, कीर्ती विद्यालय प्रायव्हेट आयटीआय, राय-शिवोली, इंडो जर्मन प्रायव्हेट आयटीआय, मार्ना-शिवोली या केंद्रात विविध व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम आहेत. या केंद्रामधून आतापर्यंत सुमारे सात हजार विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण होऊन त्यांना विविध ठिकाणी रोजगार लाभलेले आहेत, तर काहींनी स्वतंत्र व्यवसाय निर्माण करून आपल्या हाताखाली नोकरवर्ग निर्माण केला आहे. 1995 मध्ये सुरू केलेल्या या संस्थेला 25 वर्षे पूर्ण होत आहे. एकंदरित जॅकोब मॅथ्यू यांनी या व्यवसायाभिमुख केंदाच्या माध्यमातून उपेक्षित, दुर्लक्षित विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला आहे. खऱया अर्थाने स्वावलंबनाचा मार्ग दाखविला आहे. आयुष्याची संध्याकाळ गाठली तरी आपण हयात असेपर्यंत विद्यार्थ्यांच्या हितासाठी वावरणार, असा त्यांचा मनोदय आहे. गोव्यात सध्या शैक्षणिक दालने समृद्ध होत आहेत, साहजिकच सुशिक्षित बेरोजगार युवकांची फौज निर्माण होत आहे, तांडे बाहेर पडत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दहा हजार सरकारी नोकऱयांचे गाजर बेरोजगार युवकांपुढे ठेवलेले आहे. कुणाला या नोकऱयांची लॉटरी लागेल, याची वाट बेरोजगार युवक पाहत आहेत. नोकऱया मिळविण्यापेक्षा आपल्या हाताखाली नोकऱया निर्माण करण्याची कुवत या बेरोजगार युवकांपुढे निर्माण करणे आवश्यक ठरते. त्यादृष्टीने अशाप्रकारे व्यावसायिक शैक्षणिक संस्था तसेच जॅकोब मॅथ्यूसारखे नेतृत्व निर्माण होणे आवश्यक ठरते. तरच ‘आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा’ हे स्वप्न खऱया अर्थाने सार्थ ठरणार आहे.
जॅकोब मॅथ्यू यांचे पुस्तक निश्चितच इतर शिक्षकांनाही प्रेरणादायक ठरेल तसेच कार्य करण्यासाठी प्रोत्साहन लाभेल, अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही.
राजेश परब








