एकाकीपणाशी लढण्यासाठी अभिनेत्रीचे प्रयत्न
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचे तिच्या सह-कलाकारांनी नेहमीच तिच्या सकारात्मक आणि आनंदी वृत्तीसाठी कौतुक केले आहे. ती लोकांसोबत आनंदी वृत्ती राखण्यास प्राधान्य देते. परंतु आयुष्यात स्वतःला एकाकीपणाने वेढले गेल्याच्या टप्प्याला तिने तोंड दिले आहे. स्वतःच्या आयुष्याच्या या टप्प्याविषयी तिने अलिकडेच एका मुलाखतीत उघडपणे मन मोकळे केले आहे. या समस्येतून बाहेर पडण्यासाठी थेरेपिस्टची मदत घेतल्याचे तिने म्हटले आहे.

कोरोना महामारीनंतर मी एकाकीपणाने वेढले गेल्याची जाणीव झाली. मुंबईसारख्या शहरात किती तरी जण एकटे राहत आहेत. त्यांचे कुटुंब त्यांच्यासोबत नाही. मोकळेपणाने बोलता येईल असे लोक सोबत नसल्याचा प्रकार अनेकदा घडला आहे. माझ्या समस्या लोकांसमोर न बोलण्याचा विचार माझ्या मनात आला होता. इतरांना स्वतःच्या गोष्टींनी निराश किंवा दुःखी करू इच्छित नव्हते. मित्र आणि कुटुंबीयांना मी एकटी किंवा दुःखी असल्याचे दाखवू इच्छित नव्हते. अशा स्थितीत मी मदत घेण्याचा पर्याय निवडला आणि मला उत्तम थेरेपिस्ट मिळाल्याचे तिने सांगितले.
जो त्रस्त आणि एकाकीपणाला सामोरा जातोय त्याने थेरेपिस्टची मदत घ्यावी. स्वतःचे मानसिक प्रतिबिंब याद्वारे पाहता येते. थेरपीने मला मोठी मदत केल्याचे जॅकलीन म्हणाली. जॅकलीन मागील काही काळापासून घोटाळेबाज सुकेश चंद्रशेखरमुळे अडचणीत सापडली आहे.









