कोरोना कालावधीत विक्रमी कामगिरीची नोंद ः 26 टक्क्यांची वाढ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना कालावधीत देशातील व्यवसायांनी सलगपणे नवीन विक्रमांची नोंद केली आहे. देशातील कंपन्यांनी नोंदणीत विक्रम नोंदवला आहे. कॉर्पोरेट मंत्रालयाकडून सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार जून 2021 मध्ये एकूण 16,662 कंपन्यांची नोंदणी करण्यात आली आहे.
एक वर्षाच्या समान कालावधीच्या तुलनेत कंपन्यांच्या नोंदणीत 26 टक्क्यांची वाढ झाली आहे. याच कामगिरीमुळे कोरोनाच्या दुसऱया लाटेच्या संकटामध्येही देशातील व्यवसायांनी मजबूत स्थिती प्राप्त केल्याचे संकेत निर्माण केले असल्याचे पहावयास मिळत आहे.
मंत्रालयातील उपलब्ध आकडेवारीनुसार जून 2021 मध्ये नोंदणी करण्यात आलेल्या एकूण कंपन्यांमध्ये 12,722 नवीन कंपन्या आहेत. तसेच 3,940 लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप्स (एलएलपीएस) आहेत. सर्व्हिस क्षेत्रासाठी एलएलपीमध्ये लवचिक स्थिती राहिली आहे.
सर्व्हिसेस सेगमेंट तेजीत
जून 2021 मध्ये व्यवसायांमध्ये सर्व्हिसेस सेगमेंटमध्ये सर्वाधिक 29 टक्के कंपन्या म्हणजेच 3,684 कंपन्या नोंदणीकृत झाल्या आहेत. यांच्यानंतर 20 टक्के भागीदारी(2,621 कंपन्या) सोबत मॅन्युफॅक्चरिंग सेगमेंटचा नंबर लागतो.
नोंदणीत महाराष्ट्र आघाडीवर
जून 2021 मध्ये कंपन्यांच्या नोंदणीत महाराष्ट्र अव्वलस्थानी राहिला आहे. मागील महिन्यात महाराष्ट्रामध्ये जवळपास 2,521 कंपन्यांची नोंदणी झाली आहे. 1,325 कंपन्यांच्या नोंदणीसोबत उत्तर प्रदेश दुसऱया स्थानी तर 1,293 कंपन्यांच्या नोंदणीबरोबर दिल्ली तिसऱया नंबरवर राहिली आहे. हाच आकडा टक्केवारीत पाहिल्यास यामध्ये महाराष्ट्राचा टक्का 19.82 टक्के, उत्तर प्रदेश 10.42 टक्के आणि दिल्लीचा 10.16 टक्क्यांचा हिस्सा राहिला आहे.









