इंजिनिअरिंग तसेच पेट्रोलियम उत्पादनांसहीत विविध क्षेत्रातून सकारात्मक मागणी
नवी दिल्ली
कोरोना कालावधीत निर्यात क्षेत्रामधून चांगली बातमी आली आहे. वाणिज्य मंत्रालयाकडून सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार रत्न आणि आभूषण, इंजिनिअरिंग तसेच पेट्रोलियम उत्पादनांसहीत विविध क्षेत्रातून सकारात्मक मागणी राहिली आहे.
यामुळे जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात निर्यात जवळपास 52.39 टक्क्यांनी वधारुन 7.71 अब्ज डॉलर्सच्या घरात पोहोचली आहे. दुसऱया बाजूला आयात क्षेत्रानेही 1 ते 7 जून या कालावधीदरम्यान जवळपास 83 टक्क्यांपेक्षा अधिकची वाढ नोंदवत 9.1 अब्ज डॉलर्सची आयात केली असल्याची माहिती आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार इंजिनिअरिंगची निर्यात 59.7 टक्क्यांनी वाढून 74.11 कोटी डॉलर्स, रत्ने आणि आभूषणांची निर्यात 96.38 टक्क्यांच्या वाढीसह 29.78 कोटी आणि पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात ही 69.53 टक्क्यांनी वधारुन 53.06 कोटी डॉलर्सवर राहिली आहे. समीक्षकांनी केलेल्या पाहणीनुसार मात्र लोखंड आणि मसाल्यांच्या निर्यातीत नकारात्मक सूर राहिल्याचे दिसून आले आहे.
निर्यातीत वाढ झालेले देश
जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात पेट्रोलियम आणि कच्चे तेल याची आयात 135 टक्क्यांनी वाढून 1.09 अब्ज डॉलर्सवर राहिली आहे. या प्रकारे इलेक्ट्रॉनिक साहित्य, मोतीसह किमती खडय़ांची आयातही वाढली आहे. ही वाढ साधारणपणे अमेरिका, संयुक्त अरब अमिराती आणि बांगलादेश या देशातून राहिली आहे. तर दुसऱया बाजूला चीन, अमेरिका आणि संयुक्त अरब अमिरातमधून आयात तेजीने वाढत गेली आहे.









