शाळा प्रशासनावर पालकांची प्रश्नांची सरबत्ती : पालकांच्या प्रश्नांसमोर शिक्षण संस्थाही अनुत्तरीत
प्रशांत वाडेकर / देवगड:
कोरोनामुळे राज्यात वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे यावर्षी शाळांचे शैक्षणिक सत्र सुरू होऊनही शाळा सुरू होऊ शकलेल्या नाहीत. राज्य शासनाने काही जिल्हय़ांमध्ये शाळा जुलैपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत शाळांनाही कळविण्यात आले. मात्र, शाळांच्या पालक समित्यांनी पाल्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने जुलैपासून शाळा सुरू करणे धोक्याचे असल्याचे सांगत विरोध केला. देवगड तालुक्यातील सर्वच शाळांमधून पालकांनी शाळा सुरू करण्यास विरोध केला आहे. याबाबत शाळा प्रशासनासमोर पालकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
कोरोना व लॉकडाऊनमुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे हे मान्य असले तरी मुलांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्यादृष्टीने शाळा सुरू करण्यास पालकांची नापसंतीच आहे. ग्रामीण भागातील काही शाळांमध्ये पटसंख्या कमी असल्याने तेथे शाळा सुरू करण्याच्या अडचणी नाहीत. मात्र, शहरांच्या ठिकाणी शाळा सुरू करण्यास शैक्षणिक संस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहेत. शासनाच्या शाळा सुरू करण्याच्या निर्णयानंतर बहुतांशी शाळा प्रशासनांनी पालक संघाच्या सभा आयोजित करून मते जाणून घेतली. यावेळी सर्वाधिक पालकांनी शाळा सुरू करण्यास विरोध केला. शहरांमधील शाळांमध्ये मुलांची संख्या जास्त आहे तर वर्गखोल्या कमी आहेत. एका वर्गात 100 हून अधिक मुले आहेत. एका बेंचवर तीन विद्यार्थी दाटीवाटीने बसतात. अशावेळी सोशल डिस्टन्सिंगच्या मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. शाळा भरताना व शाळा सुटताना विद्यार्थ्यांची गर्दी, शाळांमध्ये एकच स्वच्छतागृह असल्याने येथे सोशल डिस्टन्सिंगचा प्रश्न निर्माण होणार आहे.
80 टक्के मुले ग्रामीण भागातील
मुलांमध्ये प्रतिकार शक्ती कमी असल्याने शाळांमधून या कोरोनाचा प्रसार वाढू शकतो. तालुक्यातील शाळांमध्ये अनेकांना क्वारंटाईन करून ठेवण्यात आले होते. त्यामुळे शाळांना योग्यप्रकारे सॅनिटाईजर फवारणी करणे आवश्यक आहे. तसेच शहरांमधील शाळांमध्ये सुमारे 80 टक्के मुले ही ग्रामीण भागातून येणारी आहेत. या मुलांना एस. टी. बसच्या 22 प्रवाशांच्या नियमानुसार आणणे परवडणारे नाही. एका शाळेमध्ये किमान एक हजारहून अधिक मुले आहेत. अशावेळी मुलांना शाळेच्या वेळेत बसने पोहोचणे कठीण आहे. तसेच खासगी वाहने देखील सोशल डिस्टन्सिंगमुळे अडचणीची ठरतील, अशी मते पालकांनी व्यक्त केली आहेत. तसेच शैक्षणिक संस्था देखील विद्यार्थ्यांमध्ये संसर्ग झाल्यास त्याची जबाबदारी घेण्यास तयार नाहीत. शासनाने शाळा सुरू करताना शैक्षणिक संस्था व पालकांवरच जबाबदाऱया सोपविल्या आहेत. त्यामुळे पालकांबरोबरच संस्था देखील कोरोनाचा संसर्ग थांबल्याशिवाय शाळा सुरू करण्याच्या मनस्थितीत नाहीत.









