737 मॅक्स विमानाच्या 43 ऑर्डर्स रद्द
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
विमान निर्मिती करणारी बोईंग कंपनीची जुलै महिन्यात 737 मॅक्स विमानाची विक्री शुन्यावर राहिली आहे. विक्रीचा आकडा सोडल्यास सोबत 737 मॅक्स विमानाच्या 43 ऑर्डर्स रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. इंडोनेशिया आणि इथोपियामध्ये झालेल्या विमान अपघातानंतर मॅक्स विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली होती. तेव्हापासून कंपनीच्या उत्पादनाला ग्रहण लागले असून तेव्हापासून कंपनीच्या अडचणीमध्ये मोठी वाढ होत गेल्याचे पहावयास मिळाले आहे.
वरील घडामोडीसोबत कोविड 19 च्या महामारीमुळे हवाई क्षेत्रातील वाहतुक जवळपास ठप्प राहिलेली आहे. याचाच प्रभाव म्हणून जूनमध्ये बोईंगची 60 विमानांची ऑर्डर रद्द करण्यात आल्याची बातमी आली आहे. यासोबत विमान कंपन्यांची स्थिती अत्यंत नाजूक होत असतानाच बोईंगने चालू वर्षात आतापर्यंत एकूण 800 विमानांच्या ऑर्डर्सचे नुकसान सहन केले असून परिस्थिती बिकट झाली आहे.
मागील आठवडय़ात अमेरिकेचे विमान नियामक फेडरल एव्हीएशन ऍडमिनिस्टेशनकडून मॅक्स विमानाच्या डिझाईनमध्ये बदल करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात बदल करण्याच्या सुचना केल्या आहेत. 2021 च्या सुरुवातीला विमान सेवा सुरळीत होणार असल्याचे संकेत व्यक्त करण्यात आले आहेत. त्यानंतरच विमानांच्या ऑर्डरीची नेमकी परिस्थिती लक्षात येणार आहे.









