वृत्तसंस्था/ मुंबई
यावर्षी एप्रिल-मे मध्ये लॉकडाऊनच्या कारणास्तव अनेक व्यवसाय बंद असल्या कारणाने नोकर भरतीवर परिणाम झाला होता. जूननंतर व्यवसाय सुरु झाल्याने पुन्हा नोकर भरतीला वेग आला. दरम्यान जुलैमध्ये नोकर भरतीमध्ये उत्साहवर्धक वाढ झाली असल्याची माहिती नोकरी जॉब्सस्पीक यांनी दिली आहे.
यांनी जाहीर केलेल्या भरती निर्देशांकामध्ये जुलैमध्ये 11 टक्के इतकी घसघशीत वाढ झाली आहे. सदरची वाढ ही मागच्या महिन्याच्या तुलनेमध्ये नोंदली गेली आहे. भरतीत वाढ ही अर्थिक सुधारणांचे संकेत असल्याचे मत नोंदवले गेले आहे.
आयटी क्षेत्रामध्ये भरतीत वाढ
डीजीटल व्यवहार ही काळाची गरज झाल्याने सर्वच क्षेत्रात हे व्यवहार वाढत आहेत. आयटी क्षेत्रामध्ये गेल्या महिन्यामध्ये भरतीत वाढ झाली आहे. आयटी सॉफ्टवेअर व सॉफ्टवेअर सेवा क्षेत्रामध्ये जुलैमध्ये 18 टक्के वाढ नोंदली गेली आहे. जूनमध्ये भरतीचे प्रमाण 11 टक्के वाढले होते.
फार्मा क्षेत्रात घसरण
दुसरीकडे फार्मा आणि याशी संबंधित क्षेत्रामधील नोकर भरतीमध्ये मात्र घसरण झाल्याची माहिती देण्यात आली आहे. फार्मा व संबंधीत क्षेत्रात भरती 5 टक्के इतकी घटली आहे. माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातही जुलैमध्ये 15 टक्के घट दिसून आली आहे.









