सर्व संघटना व कॉन्फेडरेशन्सच्या संमतीने निर्णय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विश्व बॅडमिंटन फेडरेशनने (बीडब्ल्यूएफ) कोरोना व्हायरस महामारीमुळे मेपासून जुलैपर्यंत होणाऱया सर्व आंतरराष्ट्रीय, कनिष्ठ व पॅरा बॅडमिंटन स्पर्धा तहकूब केल्याचे सोमवारी जाहीर केले. त्यात ग्रेड 2 व 3 दर्जाच्या एचएसबीसी बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर, बीडब्ल्यूएफ टूर व बीएफडब्ल्यूची मान्यता असलेल्या अन्य स्पर्धांचा समावेश आहे.
विश्व फेडरेशनने दिलेल्या माहितीनुसार, या स्पर्धाच्या आयोजित केल्या जाणाऱया यजमान देशाच्या संघटना व कॉन्टिनेन्टल कॉन्फेडरेशन्स यांच्याशी सखोल चर्चा करून मान्यता मिळाल्यानंतर हा निर्णय घेतला गेला आहे. या कालावधीत होणारी सर्वात महत्त्वाची स्पर्धा म्हणजे इंडोनेशिया ओपन 2020 (सुपर 1000) यावरही त्याचा परिणाम झाला आहे. ‘कोव्हिड 19 महामारी जगभर पसरली असल्याने सर्वानीच या कालावधीतील स्पर्धा न खेळविण्याच्या निर्णयाला मान्यता दिली. आरोग्य, खेळाडूंचे त्यांच्यासोबत असणारा, पदाधिकारी आणि बॅडमिंटन समुदाय म्हणजे चाहते यांचे स्वास्थ्य व सुरक्षा याला आमचे सर्वाधिक प्राधान्य आहे,’ असे त्यांनी सांगितले.
गेल्या आठवडय़ात विश्व बॅडमिंटन फेडरेशनने पुढील सूचना येईपर्यंत वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील खेळाडूंचे विश्व मानांकन गोठवल्याचे जाहीर केले होते. 17 मार्च 2020 पर्यंत जे मानांकन असेल तेच सध्या कायम ठेवण्यात आले आहे. ‘खेळ पुन्हा सुरू करण्याचे ठरल्यास त्यावेळी या मानांकनाबद्दल फेडरेशन स्पष्टीकरण देईल. टोकियो ऑलिम्पिक व पॅरालिम्पिक स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आल्याने या स्पर्धांसाठी पात्रता मिळविण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी नवे वेळापत्रक तयार करावे लागणार आहे. या स्पर्धांचा काही अडथळा येऊ शकतो का, याचेही पुनरावलोकन केले जाणार आहे. पुनरावलोकनाची ही प्रक्रिया अनेक आठवडे चालणार असून त्यानंतरच फेडरेशन पुढील निर्णय जाहीर करणार आहे,’ असेही त्यात म्हटले आहे. रद्द करण्यात आलेल्या बॅडमिंटन स्पर्धा पुढीलप्रमाणे आहेत.









