अंबाला वायुतळावर तैनात, पहिल्याटप्प्यात 1 फायटर, 3 प्रशिक्षणविमाने
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय हवाई दलाच्या क्षमतेमध्ये निर्णायक ताकद निर्माण करणारी राफेल लढाऊ विमाने या वर्षाच्या जुलैअखेरीस भारतात दाखल होणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये 1 फायटर विमान तर तीन प्रशिक्षण विमाने असतील. अंबाला वायुतळावर ही विमाने तैनात करण्यात येणार असून भारतात दाखल झाल्यावर या कराराला मूर्त स्वरुप देणाऱया हवाईदलप्रमुख आर. के. एस. भदोरिया यांच्या सन्मानार्थ विमानाच्या शेपटीकडील भागावर आरबी सिरिजचा नंबर असेल.तर सध्या पाकिस्तान आणि चीनच्या सीमारेषेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी ही खुषखबरी ठरणार आहे.
मे अखेरीस ही विमाने दाखल होणार होती तथापि भारतासह संपूर्ण जगभरामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने दोन महिन्यांकरता देवाणघेवाण स्थगित करण्यात आली होती. ही विमाने वायुदलामध्ये सहभागी झाल्यानंतर पाकिस्तान आणि चीनच्याही हवाई दलापेक्षा भारतीय हवाई दल अधिक सक्षम होणार आहे. पाकिस्तानकडे असणारी अमेरिकन बनावटीच्या एफ 16 विमानांपेक्षाही राफेल विमाने अधिक घातक असतील. राफेलच्या एका विमानाला रोखण्यासाठी दोन एफ 16 विमानांची गरज पडेल. दीडशे किलोमीटरवरुन ही विमाने लक्ष्याचा अचूक भेद करु शकतात, यावरुन राफेलच्या क्षमतेचा अंदाज येऊ शकतो. आणि या दोन्ही देशांकडे राफेलच्या तोडीचे लढाऊ विमान सध्या नाही.
संरक्षण विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात जुलैअखेर दोन आसनी प्रशिक्षण विमाने आणि 1 लढाऊ विमान असेल. आरबी सिरीजमधील ही विमाने असून 2022पर्यंत सर्व 36 विमाने हवाई दलाच्या ताफ्यात असतील. पहिले विमान 17 गोल्डन एरोजचे कमांडिंग ऑफिसर फ्रान्स पायलटच्या बरोबरीने उड्डाण करतील. हवेतच इंधन भरण्याची यामध्ये सुविधा असून फ्रान्समधून येताना मध्य आशिया क्षेत्रात थांबतील. त्यानंतर उड्डाण केल्यावर भारतीय हवाई ऑईल टँकर आयएल 78 द्वारे हवेतच इंधन भरले जाईल. विमान फ्रान्समधून थेट भारतामध्ये येऊ शकते. तथापि 10 तासांचे उड्डाण धोकादायक ठरु शकते, असे सांगण्यात आले.
भारतीय हवाई दलातील निवडक पायलटच्या बॅचने फ्रान्समधील हवाई तळावर या विमानांचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. दोन्ही देशांमधील लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानतंर दुसरी टीम प्रशिक्षणासाठी जाणार आहे. या विमानांची पुढील बांधणी भारतामध्ये केली जाणार असल्याने उर्वरित साहित्यही मालवाहू विमानाने भारतात पाठवण्यात आले आहे. भारताने सप्टेंबर 2016 मध्ये फ्रान्सबरोबर 36 विमानांचा 60 हजार कोटींचा करार केला होता. यातील पहिली 18 विमाने अंबाला वायुतळावर तर उर्वरित 18 विमाने पूर्वोत्तर भागातील हाशीमारा येथे तैनात केली जाणार आहेत.
सुखोईपेक्षाही अधिक कार्यक्षम
सुखोई 30 एमकेआय या रशियन बनावटीच्या लढाऊ विमानांपेक्षा राफेल अधिक आधुनिक असून दीडपट अधिक कार्यक्षम आहे. राफेलची उड्डाण क्षमता 780 ते 1055 किलोमीटर प्रतीतास आहे तर सुखोईची 400 ते 550 किलोमीटर आहे. राफेल प्रतीतास 5 सोर्टीज तर सुखोईकडे तीन सोर्टीजची क्षमता आहे.









