अंबाला हवाई तळावर पहिली तुकडी तैनात होणार : चीन-पाकिस्तानला धोक्याची घंटा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राफेल लढाऊ विमानांची पहिली तुकडी येत्या 27 जुलै रोजी भारतात दाखल होणार आहे. हरियाणातील अंबाला हवाई तळावर राफेलची पहिली तुकडी तैनात होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. सध्या लडाखमध्ये चीनसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राफेल विमानांचे भारतातील लँडिंग अतिशय महत्त्वाचे मानले जात आहे.
फ्रान्समधील इस्ट्रेस येथून सहा विमानांची पहिली तुकडी भारतात दाखल होईल. यावेळी फ्रान्समधील पायलटांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय पायलटच सारथ्य करणार आहेत. भारतात दाखल झाल्यानंतर काही किरकोळ सरावाअंती पुढील काही दिवसांतच सर्व राफेल विमाने युद्धासाठी सज्ज होणार आहेत. भारतीय हवाई दलामध्ये राफेलचा समावेश होणे पाकिस्तान-चीनसाठी एक धोक्मयाची घंटा असेल. सध्या चीन-पाकिस्तानकडे राफेलच्या दर्जाचे कोणतेही लढाऊ विमान नसल्यामुळे भारताची ताकद निश्चितच वाढणार आहे.
अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज ‘राफेल’
भारताला पुरवठा केली जाणारी राफेल विमाने अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज आहेत. या विमानांमध्ये हवेतून हवेत तब्बल 150 किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता आहे. राफेल हे चौथ्या पिढीचे अत्याधुनिक लढाऊ विमान म्हणून ओळखले जाते. फ्रान्ससमवेत झालेल्या करारानुसार आगामी तीन वर्षात भारताला 36 राफेल विमाने प्राप्त होणार असून त्यांची किंमत 7.88 अब्ज युरो म्हणजे जवळपास 59 हजार कोटी रुपये इतकी आहे.
मोदी सरकारकडून कराराला मूर्त स्वरुप
फ्रान्समधील राफेल लढाऊ विमाने प्राप्त करण्यासाठी भारताने संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कार्यकाळापासूनच प्रयत्न सुरू केले होते. मात्र, संपुआच्या काळात हा करार पूर्ण होऊ शकला नव्हता. अखेर रालोआचे सरकार सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल विमान खरेदी करारात काही महत्त्वपूर्ण बदल केले होते. करारातील सुधारणांमुळे भारताची तब्बल 5 हजार 600 कोटी रुपयांची बचत झाली आहे. तसेच भारतीय कंपन्यांना 22 हजार कोटी रुपयांची विमान निर्मितीसंबंधीची कामेही उपलब्ध झाली होती.
जम्मू काश्मीरमधील उरी येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण तयार झाल्यामुळे संभाव्य युद्धाचे ढग दाटल्यानंतर भारताने फ्रान्सशी लढाऊ विमानांसाठीचा करार केला होता. त्यातच आता लडाखमधील संघर्षावरून भारत-चीनमध्ये तणाव सुरू असताना ही लढाऊ विमाने भारताच्या ताब्यात मिळत आहेत.









