पीपल्स रिपब्लिकन पार्टीची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
प्रतिनिधी / कोल्हापूर
जुन्या शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या जागी राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीने केली आहे. या मागणी निवेदन जिल्हाध्यक्ष दगडू भास्कर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सोमवारी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना दिले.
निवेदनातील माहिती अशी : शाहूपुरी पोलीस ठाणे ज्या इमारतीत होते. त्या इमारतीला ऐतिहासिक असे महत्व आहे. माणगाव परिषदेसाठी डॉ. आंबेडकर 20 व 21 मार्च 1920 रोजी कोल्हापूरमध्ये आले होते. राजर्षी शाहू महाराजांनी डॉ. आंबेडकर यांच्या वास्तव्याची सोय स्टेशन रोडवरील आपल्या गेस्ट हाऊसमध्ये केली होती. या ठिकाणी या दोन्ही महान व्यक्तीमत्वाची भेट झाली होती. त्यानंतर 1939 मध्ये खासबाग मैदानात झालेल्या दलित परिषदेसाठी आणि 1952 च्या राजाराम महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनासाठी व हिंदू कोडबिलावरून केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर डॉ. आंबेडकर कोल्हापुरात आले होते. त्यावेळी ते गेस्ट हाऊसच्या या इमारतीत वास्तव्यास हेते. पुढे या इमारतीत नंतर शाहूपुरी पोलीस ठाणे झाले. काही वर्षांपूर्वी ही इमारत जमीनदोस्त करण्यात आली. आता पुन्हा या ठिकाणी शाहूपुरी पोलीस ठाण्याची इमारत उभारण्याचा घाट घातला जात आहे.
पण पूर्वीपासून या ठिकाणी शाहू-आंबेडकर स्मारक व्हावे, अशी मागणी आहे. आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी विधानपरिषदेत या स्मारकाच्या उभारणीची आग्रही मागणी केली आहे. शाहू-आंबेकर यांच्यातील भेटीचा ऐतिहासिक पुरावा नष्ट केला जात आहे. तेथे स्मारक उभारून स्मृती जतन कराव्यात, अशी मागणी असल्याचे दगडू भास्कर यांनी सांगितले. निवेदन देताना शिष्टमंडळात नंदकुमार गोंधळी, विद्याधर कांबळे, आर. बी. कोसंबी, सुरेश सावर्डेकर, रतन कांबळे, रमेश पाचगावकर, मच्छिंद्र राजशील, विलास कांबळे, यशवंत हेगडे, जगन्नाथ कांबळे आदींचा समावेश होता.