तीक्ष्ण हत्याराने वार करुन घेतला जीव, कारण गुलदस्त्यात, मारेकरी फरारी
प्रतिनिधी/ बेळगाव
जुने बेळगाव येथील एका युवकाचा खून झाला आहे. गुरुवारी सकाळी खुनाचा हा प्रकार उघडकीस आला असून हा खून कोणी व कशासाठी केला याचा उलगडा झाला नाही. शहापूर पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. तिक्ष्ण हत्याराने त्याच्या डोक्मयावर व चेहऱयावर हल्ला करुन त्याचा खून करण्यात आला आहे.
जयपाल मसणू गराणी (वय 35, रा. आंबेडकर गल्ली, जुने बेळगाव) असे खून झालेल्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. जयपाल हा बुधवारी मध्यरात्री 12.30 वाजेपर्यंत आपल्या घरी होता. त्यानंतर तो घराबाहेर पडला असून घरापासून जवळच खुल्या जागेवर गुरुवारी सकाळी खून झालेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला आहे.
सकाळी फिरायला जाणाऱयांनी जयपालचा मृतदेह पाहून शहापूर पोलिसांना माहिती दिली. मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी, शहापूरचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार, पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ आदी अधिकाऱयांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
जयपालचा भाऊ सुभाष गराणी यांनी शहापूर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. जयपाल हा व्यवसायाने कार चालक होता. त्याच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, तीन मुले, भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे.
एका नातेवाईकांच्या हळदी समारंभात भाग घेण्यासाठी जुने बेळगाव येथील कलमेश्वर मंदिरात तो गेला होता. हळदी समारंभ आटोपून जयपाल आपल्या घरी आला होता. मध्यरात्री 12.30 वाजेपर्यंत जयपाल घरीच होता. त्यानंतर पत्नी झोपी गेली. जयपाल घरातून केव्हा बाहेर पडला, त्याला कोणी बोलाविले याचा शोध घेण्यात येत आहे. यासंबंधी शहापूर पोलिसांशी संपर्क साधला असता तपास करण्यात येत असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले.
भांडणाची किनार की आणखी काय?
प्राथमिक माहितीनुसार तीन वर्षांपूर्वी स्थानिक तरुणांबरोबर जयपालचे भांडण झाले होते. 8 वर्षांपूर्वीही भांडणाचा प्रकार घडला होता. त्याच्या खुनाला नेमकी कोणती कारणे आहेत, याचा तपास करण्यात येत असून जयपाल बरोबर मध्यरात्रीपर्यंत त्याचा एक मित्र सोबत होता. आता त्याचाही शोध घेण्यात येत आहे.









