बुकलेट-हस्तलिखित स्वरुपातील वाहन परवाना बदलण्यासाठी 12 मार्च अंतिम मुदत
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सध्या बुकलेट स्वरुपातील जुने ड्रायव्हिंग लायसन्स असलेल्यांना ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी परिवहन विभागाकडून शेवटची संधी दिली जात आहे. परिवहन विभागाने देशातील सर्व जिल्हय़ांच्या ‘डीटीओं’ना हस्तलिखित वाहन परवाना लवकरात लवकर ऑनलाईन करण्यास सांगितले आहे. यासंबंधी ऑनलाईन नोंदणीची सुविधा भारत सरकारच्या सारथी वेब पोर्टलवर 12 मार्चपर्यंतच उपलब्ध असणार आहे. त्यामुळे 12 मार्चनंतर हस्तलिखित जारी केलेल्या परवान्यांसह ड्रायव्हिंग लायसन्सची बॅकलॉक एन्ट्री करता येणार नसल्याचे परिवहन मंत्रालयाने कळवले आहे.
भारत सरकारच्या निर्देशांनंतर पुस्तिका किंवा हस्तलिखित स्वरूपात असलेला वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) ऑनलाईन करण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. त्यामुळे जुने लायसन्स अद्ययावत न केलेल्यांना 12 मार्च रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत राज्यांच्या जिल्हा परिवहन कार्यालयात मूळ परवान्यासह ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे. याबाबतचा आदेश परिवहन विभागाने राज्यातील सर्व आरटीओंना जारी केला आहे.
पूर्वी ड्रायव्हिंग लायसन्स बुकलेट स्वरुपात दिले जात होते. बुकलेट स्वरुपातील लायसन्स खराब होण्याची भीती नेहमीच असते. तसेच हस्तलिखित ड्रायव्हिंग लायसन्स सांभाळण्यात बऱयाच समस्या येत असल्यामुळे ते काही वर्षांपासून स्मार्टकार्ड स्वरुपात दिले जात आहे. सदर लायसन्समधील चिप कार्डचे नुकसान होण्याचा धोका जवळजवळ नगण्य आहे. त्यामुळेच सर्व जुनी लायसन्स जमा करून नवे ऑनलाईन लायसन्स घेण्याचे निर्देश परिवहन मंत्रालयाकडून जारी करण्यात आले होते. याच्या अद्ययावतीकरणादरम्यान कोरोनाच्या काळात सर्वसामान्यांना मुदतवाढ देण्यात आली. परंतु आता पुन्हा मुदत वाढवण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.









