वरुण धवन अन् कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत
फॅमिली ड्रामा चित्रपट जुग जुग जियोच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा झाली आहे. वरुण धवन आणि कियार अडवाणी यांचा हा चित्रपट पुढील वर्षी 24 जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. याची माहिती त्यांनी सवतःच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक छायाचित्र आणि चित्रफित शेअर करत दिली आहे.
छायाचित्रात वरुण आणि कियारा हे वधूवराच्या वेशात दिसून येत आहेत. अभिनेत्याकडून शेअर करण्यात आलेल्या छायाचित्राला सोशल मीडियावर चाहत्यांकडून मोठी पसंती मिळतेय. ‘कुटुंब हेच सर्वस्व’ असे वरुणने चित्रफित शेअर करत म्हटले आहे.
या चित्रपटात वरुण आणि कियारा मुख्य भूमिका साकारत आहेत. तर अभिनेता अनिल कपूर आणि नीतू कपूर हे वरुणच्या आईवडिलांच्या भूमिकेत दिसून येणार आहेत. राज मेहता यांच्याकडून दिग्दर्शित या चित्रपटात मनीष पॉल आणि युटय़ूबर प्राजक्ता कोली देखील काम करत आहे.
वरुण लवकरच अमर कौशिक यांच्या ‘भेडिया’ या चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटात क्रीति सेनॉन नायिकेची भूमिका साकारत आहे. याचबरोबर शशांक खेतानचा चित्रपट ‘रणभूमि’ आणि ‘मिस्टर लेले’मध्ये तो दिसून येईल.









