नवी दिल्ली
देशातील कोरोना परिस्थिती वाढत असल्याने ग्रुप ऑफ सेवन म्हणजेच जी-7 शिखर परिषदेसाठी ब्रिटनला न जाण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. पुढच्या महिन्यात 11 ते 13 जूनला दरम्यान ही परिषद कोर्नवेल येथे होणार असून ब्रिटनचे पंतप्रधान आणि परिषदेचे यजमान बोरीस जॉन्सन यांनी मोदी यांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रण दिले होते. विदेश मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार देशातील कोरोनाची सद्यस्थिती पाहता या परिषदेला न जाण्याचा निर्णय पंतप्रधानांनी घेतला आहे. कोरोना प्रकोप झाल्यापासून मोदी यांचा हा रद्द झालेला दुसरा विदेश दौरा आहे. विशेष पाहुणे म्हणून आमंत्रण दिल्याबद्दल मोदींनी जॉन्सन यांचे आभार मानले आहेत.
कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, अमेरिका, ब्रिटनसह युरोपीय संघ जी-7 मध्ये सामील आहेत. यंदा ब्रिटनच्या अध्यक्षतेखाली ही शिखर परिषद होत आहे. ब्रिटनने भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया व द. आफ्रिका देशांना या परिषदेचे आमंत्रण दिले आहे.









