रशियाने युक्रेनवर युद्ध लादून जरी आंतरराष्ट्रीय नियमांचा भंग केला असला, तरी त्याला जी-20 मधून बाहेर काढणार नाही, असे प्रतिपादन जी-20 च्या एका साहाय्यक गटाने केले आहे. जगात सध्या अभूतपूर्व अन्नटंचाई निर्माण झाली आहे. रशिया हा गव्हाचा मोठा उत्पादक देश आहे. त्यामुळे त्याला जी-20 किंवा अन्य आंतरराष्ट्रीय संस्थांमधून बाहेर काढल्यास रशिया गहू आणि इतर धान्ये निर्यात करणार नाही. त्यामुळे जागतिक अन्नटंचाईत भरच पडेल असा विचारप्रवाह आहे. त्यामुळे सध्यातरी रशियाच्या आंतरराष्ट्रीय स्थानाला धक्का न लावण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. अमेरिकेलाही या संबंधातील मर्यादांची जाणीव आहे.
या युद्धामुळे रशियाचीही आर्थिक हानी मोठय़ा प्रमाणात झालेली आहे. ती पाहता युरोपियन सहाय्यता गटांचे हे मत रशियाच्याही पथ्यावर पडणार आहे. आता रशियाने शांतता बोलण्यांवर जास्त भर द्यावा आणि आक्रमणे थांबवावीत असे आवाहन अनेक आंतरराष्ट्रीय बिगर सरकारी संस्थांनीही केले आहे.
युक्रेनला शस्त्र पुरवठा
अमेरिकेकडून युक्रेनला सातत्याने शस्त्रपुरवठा करण्यात येत आहे. तीन दिवसांपूर्वी अमेरिकेने सहा मोठय़ा नौका भरुन युद्धसामग्री आणि क्षेपणास्त्रांची पाठवणी युपेनला केली होती. ही जहाजे आता युक्रेनच्या बंदरावर पोहचली असून त्यामुळे या देशाची प्रतिकाराची क्षमता वाढली आहे. या शस्त्रांमध्ये घातक क्षेपणास्त्र प्रणालीचा समावेश असून रशियाच्या रणगाडय़ांना प्रभावी प्रत्युत्तर देण्यास ही प्रणाली समर्थ असल्याचे बोलले जाते. याशिवाय अमेरिकेने शक्तीशाली मशिनगन्स आणि इतर प्रकारचा अत्याधुनिक दारुगोळाही पाठविला आहे.
युरोपियन संसद प्रमुख कीव्हमध्ये
युरोपियन संसदेच्या अध्यक्षा रॉबर्टा मेत्सोला यांनी युक्रेनला भेट देण्याचा निर्णय घेतला असून त्या शुक्रवारी संध्याकाळी युपेनला पोहचल्याचे वृत्त आहे. राजधानी कीव्ह येथे त्या युक्रेनचे नेते झेलेन्स्की यांची भेट घेऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. त्या दोन दिवस युक्रेनमध्ये राहतील आणि या देशाच्या आणखी काही भागांनाही भेट देतील असे त्यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले.









