वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताने जी-20 ची शिखर परिषद उत्तमरित्या आयोजित केली आहे, अशी प्रशंसा चीनकडूनही करण्यात आली आहे. अमेरिका आणि रशिया या दोन महासत्तांनी भारताच्या जी-20 नेतृत्वाचे कौतुक यापूर्वीच केले आहे. आता चीननेही भारताची पाठ थोपटल्याने परस्परविरोधी महासत्तांही भारताचे महत्व जाणले आहे, असा या घटनाक्रमाचा अर्थ लावला जात आहे.
विशेषत: या शिखर परिषदेच्या अंती जे ‘दिल्ली घोषणापत्र’ प्रसिद्ध करण्यात आले, त्यातून भारताची मुत्सद्देगिरी आणि आंतरराष्ट्रीय व्यवहार हाताळण्याचे कौशल्य अधिकच स्पष्टपणे समोर आले. युक्रेन युद्ध हा कळीचा मुद्दा होता. त्यासंबंधी दिल्ली घोषणापत्रात (संयुक्त निवेदनात) कोणती वाक्यरचना असणार याकडे साऱ्या जगाचे उत्सुकतेने लक्ष होते. या मुद्द्यावर पाश्चिमात्य देश आणि रशिया, तसेच चीन यांचे एकमत होणार नाही. त्यामुळे परिषदेचे नेतृत्व करणाऱ्या भारताची कोंडी होईल असाही मतप्रवाह होता. तथापि, पाश्चिमात्य देश आणि त्यांचे विरोधक यांच्यातील सुवर्णमध्य नेमकेपणाने साधला. आपला मित्र असणाऱ्या रशियाविरोधात कठोर भाषा या घोषणापत्रात येऊ दिली नाही. पण त्यासमवेतच जग आज कोणत्याही युद्धाच्या विरोधात असल्याचा स्पष्ट संदेशही देण्यात आला. त्यामुळेच दोन्ही परस्परविरोधी बाजूंना समाधानी राखण्यात भारताला यश आले.
केवळ पंतप्रधान मोदींमुळेच शक्य

हा समतोल राखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: पुढाकार घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या याचे श्रेय आंतरराष्ट्रीय पातळीवर दिले जात आहे. अमेरिका, रशिया आणि चीन या तीन्ही महासत्तांनी भारताची प्रशंसा केल्याने भारताची मान अधिकच उंच झाली आहे. एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या महासत्तांमध्ये घोषणापत्रासंबंधी एकवाक्यता घडवून आणण्याचे हे काम केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच शक्य झाले. अन्य कोणाला ते जमले नसते, अशी भलावण आज जगातील मान्यवर आंतरराष्ट्रीय तज्ञही करीत आहेत. भारताच्या जागतिक महत्वाच्या दृष्टीने ही बाब अभिमानास्पद आहे, अशी सार्वत्रिक भावना आहे.









