नवी दिल्ली / वृत्तसंस्था :
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा (इस्रो) नवा दूरसंचार उपग्रह जीसॅट-30 चे एरियन-5 या प्रक्षेपकाद्वारे 17 जानेवारी रोजी प्रक्षेपण केले जाणार आहे. हे प्रक्षेपण प्रेंच गुयानाच्या कोउरू शहरातून पहाटे 2.35 वाजता केले जाणार असल्याची माहिती इस्रोने दिली आहे. इस्रोची 2020 मधील ही पहिलीच मोहीम असून याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
जीसॅट-30 इस्रोने निर्माण केलेला उपग्रह असून तो इनसॅट उपग्रहाच्या जागी काम करणार आहे. या उपग्रहामुळे राज्य संचालित आणि खासगी सेवा प्रदात्यांना दूरसंचर लिंक प्रदान करण्याच्या क्षमतेत भर पडणार आहे. मोहिमेचा एकूण कालावधी 38 मिनिटे, 25 सेकंदांचा राहणार आहे. या उपग्रहाचे वजन सुमारे 3100 किलोग्रॅम आहे.
प्रक्षेपणाच्या 15 वर्षांपर्यंत हा उपग्रह कार्यरत राहणार आहे. जियो-इलिप्टिकल कक्षेत हा उपग्रह स्थिरावला जाणार आहे. या उपग्रहात सौरघट तसेच बॅटरी असून त्यातून ऊर्जा प्राप्त होणार आहे. एरियन या प्रक्षेपकाच्या कंपनीला 40 वर्षे पूर्ण झाली आहेत.
सद्यकाळात इस्रोची आदित्य-एल 1 उपग्रहासह एकूण 25 उपग्रह प्रक्षेपित करण्याची योजना आह. आदित्य-एल 1 हा उपग्रह पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटर अंतरावरील लग्रनिज बिंदू (एल 2) नजीकच्या हॉलो ऑर्बिटमध्ये प्रवेश करणार आहे. आदित्य-एल 1 उपग्रह सौर कोरोनाचा अभ्यास करणार असून तेथे 1 लाख अंशांपेक्षा अधिक तापमान असते. सूर्यातून उत्सर्जित होणारे क्रोमोस्फीयर आणि कण प्रवाहाचे अध्ययन देखील हा उपग्रह करणार आहे.
अन्य मोहीम
चालू वर्षातील अन्य मोहिमांमध्ये एसएसएलव्ही सामील आहे. हा प्रक्षेपक पृथ्वीच्या कनिष्ठ कक्षेत छोटे उपग्रह, जीएसएलव्ही, जीसॅट-20 उपग्रह, एनएव्हीआयसी, इंडियन डेटा रिले सॅटेलाईट सिस्टीम आणि एक्सपोसेट स्थिरावण्यात भूमिका बजावणार आहे.