ऑनलाईन टीम/तरुण भारत
युक्रेन आणि रशियातील तणाव दिवसेंदिवस वाढत असून आज युद्धाच्या चौथ्या दिवशीही हल्ले होत आहेत.अशा परिस्थितीत युक्रेनमध्ये अडकलेल्या जवळपास १६ हजार भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारत सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. आतापर्यंत युद्धग्रस्त युक्रेनमधून ९४९ भारतीय नागरिकांना सुखरुपरित्या भारतात आणण्यात आले आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना भारतात आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत असताना एका भारतीय युवतीने मायदेशात परतण्यास नकार दिला आहे.
दरम्यान, रशियाने हल्ला केल्याने युक्रेनमध्ये अतिशय चिंताजनक स्थिती आहे. या युद्धात भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. काही जणांना भारतात आणले, तर काही जण अद्यापही परतीची वाट पाहत आहेत. सरकार विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी विशेष मोहीम राबवत आहे. पण, एका भारतीय विद्यार्थिनीने युक्रेन सोडण्यास नकार दिला आहे. तिनं माणुसकी जपत संधी मिळूनही भारतात परतण्यास नकार दिला. हरियाणातील रहिवासी असणारी ही युवती युक्रेनमध्ये एका घरात भाड्याने राहतेय. तिच्या घरमालकाने आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी युक्रेनियन सैन्यात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यांच्या मागे पत्नी आणि तीन मुले असा परिवार आहे. आता या भारताच्या कन्येने आपल्या घरमालकाच्या कुटुंबाचा सांभाळ करण्याची जबाबदारी उचलली आहे. मी कदाचित जीवंत राहील किंवा माझा जीवही जाऊ शकतो. पण या मुलांना आणि त्यांच्या आईला अशा स्थितीत सोडणार नाही, असं तिनं तिच्या आईला सांगितल्याचं हरियाणातील एका शिक्षिकेने सांगितलंय. द ट्रिब्युन या वेबसाईटनं हे वृत्त दिलंय.