संमेलनाध्यक्षा नीला आपटे यांचे प्रतिपादन ः 21 वे मराठी बालसाहित्य संमेलन उत्साहात
प्रतिनिधी/ बेळगाव
जीवन आणि साहित्य यांचा निकटचा संबंध आहे. त्यामुळे जीवन आणि साहित्य परस्परांना पूरक आहेत. साहित्य हे जीवनाला प्रेरीत करते आणि त्यातून माणूस घडतो. उत्तम दर्जाचे साहित्य बालकांच्या हातात पडले पाहिजे. त्यातूनच बाल साहित्याची नवनिर्मिती होते, असे विचार नीला आपटे यांनी मांडले.
गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी बेळगाव आयोजित शनिवारी 21 वे मराठी बालसाहित्य संमेलन पार पडले. यावेळी त्या संमेलनाध्यक्षा म्हणून बोलत होत्या. गोगटे रंगमंदिर, कॅम्प येथील डॉ. अनिल अवचट साहित्यनगरीत हे संमेलन झाले.
व्यासपीठावर प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर, उद्घाटक मारुती सांबरेकर, सुभाष ओऊळकर, चंद्रकांत पाटील, माजी विद्यार्थिनी आर्या गायकवाड आदी उपस्थित होते. प्रारंभी मराठी विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत आणि मराठी अभिमान गीत सादर केले. उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि फोटो पूजन झाले.
नीला आपटे म्हणाल्या, अनेकांच्या जीवनाची दिशा साहित्यामुळे बदलली आहे. याबरोबर स्वातंत्र्य लढय़ात अनेकांना झोकून देण्याची प्रेरणा साहित्यातून मिळाली ही साहित्याची ताकद आहे. साहित्य संमेलनातून नवनिर्मिती होते. आणि यातूनच उत्तम साहित्यिक निर्माण होतात. आजच्या पिढीकडे उत्कृ÷ सादरीकरण, अभिनव भाषा शैली असल्यामुळे साहित्य अधिक समृद्ध होत आहे. साहित्य आणि भाषा ही व्यक्त होण्याची प्रभावी माध्यमे आहेत. त्यामुळेच जीवनातील वास्तव बाहेर येत आहे.
20 व्या शतकाच्या सुरुवातीला बालसाहित्याच्या पाऊलखुणा जाणवू लागल्या आणि तेथून पुढे बालसाहित्य अधिक समृद्ध आणि दर्जेदार झाले. मुलांचा बालसाहित्यात सहभाग वाढत आहे. त्यामुळे बालकांनी बालकांसाठी तयार केलेल्या साहित्याची निर्मिती होत आहे. साहित्याची माध्यमे बदलत असून दृकश्राव्य माध्यम बालमनावर अधिक दृढ होत आहे. मौखिक साहित्याबरोबर लिखित साहित्य देखील महत्वाचे आहे. लहान मुले ज्यावेळी साहित्याची निर्मिती करतील, त्यावेळी त्यांच्या भावमुद्रा देखील साहित्य उमटवतील. बालसाहित्य संमेलन हे बालकांसाठी संधी असून जे मनात येईल, ते लिहित चला, त्यातूनच बालसाहित्याची निर्मिती होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
विविध विषयांवर आधारीत कथा सादर
संमेलनाच्या पहिल्या सत्रात विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आधारीत कथा सादर केल्या. यावेळी या कथांना उपस्थितांनी टाळय़ांची दाद देवून प्रोत्साहन दिले. यावेळी समृद्धी पाटील हिने ‘आपली माणसं’, कुशल गोरल ‘जिवलग मित्र’, मालती पाटील ‘आंबोळीची शेत’, परशराम उसनकर ‘पदराआडची माया’, विशाल शहापूरकर ‘गड आला पण सिंह गेला’, ही कथा सादर करून शिवकाळातील चित्र डोळय़ासमोर उभे केले. या सत्राचे सूत्रसंचालन छत्रू पाटील यांनी केले.
बालकवींचे विविध गोष्टींवर भाष्य
संमेलनातील दुसऱया सत्रात बाल कवींनी विविध गोष्टींवर भाष्य करणाऱया कविता सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली. सहभागी बाल कवींनी धीरगंभीर कविता सादर करून उपस्थितांना खिळवून ठेवले. यावेळी सृष्टी देसाई हिने ‘स्वर लतेला श्रद्धांजली’, सर्वेश सुतार ‘बुलंद आवाज’, लावण्या सांबरेकर ‘जगणे मुलीचं’, प्रतीक पाटील ‘निसर्ग आणि ऋतू’, प्रियल चौगुले ‘किनारा’, रोशनी पाटील ‘अन्नदाता’, मणाली नेवगिरी ‘शेतकरी’, हर्षदा वारेकर ‘मी’, स्नेहल दळवी ‘कोरोना क्हायरस’, गायत्री आडगावे ‘ आरती रोगराईची’, वेदिका खन्नुकर ‘जीवनाचे सार्थक’, रचना पाऊले ‘वृद्धाश्रम’ ही कविता सादर करून वृद्धाश्रमात पाठवून देणाऱया मुलांची व्यथा मांडली.
यावेळी उद्घाटक मारुती सांबरेकर यांनी मनोगत व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. शाळेची माजी विद्यार्थिनी आर्या गायकवाड हिने प्रास्ताविक केले. तर अथर्व गुरव, सौम्या पाखरे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. यावेळी डॉ. एन. डी. पाटील, लता मंगेशकर, रमेश देव, सिंधूताई सपकाळ, अनिल अवचट, बाबासाहेब पुरंदरे, सुधा नार्वेकर आदींना श्रद्धांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी शिक्षक, पालक, विद्यार्थी, रसिक बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सविता यांनी केले. तर आभार इंद्रजित मोरे यांनी मानले.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा!
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, रविवारी मराठी भाषा दिनी तो केंद्र शासनाने जाहीर करावा, असा ठराव मराठी बालसाहित्य संमेलनात इंद्रजीत मोरे यांनी मांडला. याला उपस्थितांनी टाळय़ांचा गजरात अनुमोदन दिले.









