प्रतिनिधी/ वास्को
जीवनावश्यक वस्तूंचे योग्य वाटप होत नसल्याच्या निषेधार्थ कंटेनमेंट झोनमधील नागरिकांनी रविवारी संध्याकाळी जिल्हाधिकाऱयांच्या भेटीची मागणी केली. त्यामुळे या वस्तीत काही वेळ तणाव निर्माण झाला. मात्र, पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवून संबंधीत अधिकाऱयांची भेट घडवून आणण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव पांगला.
मांगोरहिलच्या कंटेनमेंट झोनमधील छोटा मांगोर या वस्तीतील नागरिकांनी रविवारी संध्याकाळी आवाज उठवला. मांगोरहिलच्या नाक्यावर ज्या ठिकाणी पोलिसांनी कडे केलेले आहे, त्या ठिकाणी हे लोक एकत्र आले होते. कंटेनमेंट झोनमध्ये लोकांना जीवनावश्यक वस्तू मिळवण्यासाठी कष्ट पडत आहेत. सरकारकडून योग्य प्रमाणात ही सोय होत नाही. काहींना आवश्यक वस्तू मिळतात तर काहींना मिळतच नाहीत असा दावा या लोकांनी केलेला असून ही गैरसोय दूर करावी. सर्व लोकांना जीवनावश्यक वस्तू पुरवण्यात याव्यात अशी मागणी त्यांनी केली. ही मागणी मांडण्यासाठी आम्हाला जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकाऱयांची भेट हवी आहे. त्यामुळे आम्हाला जाऊ द्यावे अशी मागणी त्यांनी उपस्थित पोलीस अधिकाऱयांकडे केली. मात्र, तत्काळ हे भेट घडवून आणणे शक्य नसल्याचे पोलिसांनी जमावाला सांगून त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जमाव पांगला. या घटनेमुळे जवळपास अर्धा तास या वस्तीत तणाव निर्माण झाला.
कंटेनमेंट झोनमधील लोकांना त्यांच्या तक्रारी मांडण्यासाठी आज सोमवारी दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत उपजिल्हाधिकाऱयांशी भेट घडवून आणली जाणार आहे.
मुरगावच्या कोरोना बाधीत नगरसेवकांची संख्या झाली सहा
मागच्या काही दिवसांत मुरगावच्या नगराध्यक्षांसह पाच नगरसेवक कोरोना बाधीत झाले होते. रविवारी संध्याकाळपर्यंत अन्य एका नगरसेवकाची त्यात भर पडली. त्यामुळे गेल्या चार दिवसांत मुरगाव पालिका मंडळातील कोरोना बाधीत नगरसेवकांची संख्या सहा झाली आहे. दोन अधिकारीही कोरोना बाधीत झालेले आहेत. या सर्वांवर हेडलॅण्ड सडय़ावरील कोविड कॅअर सेंटरमध्ये उपचार करण्यात येत आहेत. मुरगावच्या अनेक नगरसेवकांना कोरोनाची बाधा झाल्याच्या अफवाही सध्या वास्कोत पसरत आहेत.









