ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील लॉक डाऊन तीन मे पर्यंत वाढत असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करत पंतप्रधानांच्या या निर्णयाचे स्वागत केले. तसेच देशात मुबलक प्रमाणात अन्नधान्य साठा, जीवनावश्यक वस्तू, औषधे उपलब्ध असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ते आपल्या ट्विट मध्ये म्हणतात की, देशामध्ये कोरोना चा प्रादुर्भाव अजून वाढू नये आणि भारतवासीयांचे संरक्षण व्हावे म्हणून या हेतूने पंतप्रधानांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचे मी स्वागत करतो आणि आभार मानतो.
लॉक डाऊन च्या काळात सर्व राज्ये केंद्र सरकार सोबत काम करत आहेत. तसेच आपल्या देशात सद्यस्थितीत अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू आणि औषधे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे कोणीही घाबरून जाण्याची गरज नाही.
तसेच आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्यांनी आपल्या आजूबाजूच्या परिसरातील गरीब जनेतला मदत करावी असे आवाहन अमित शहा यांनी यावेळी केले.