अभिनेत्री निर्मिती सावंत यांचे प्रतिपादन: व्हॅक्युम क्लीनर नाटकानिमित्त ‘तरूण भारत’शी साधला संवाद
जान्हवी पाटील / रत्नागिरी
कोणतेही क्षेत्र असो जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आपल्या कुटुंबाची साथ आणि पाठिंबा महत्वाचे आहे आज माझ्यासोबत माझे कुटुंब आहे म्हणून मी खूप समाधानाने अभिनय क्षेत्रात काम करते. अभिनया पलीकडे मी एक सून, आई, बहीण, वहीनी, काकी आहे, ही सगळी नाती पार पाडत असताना जो आनंद होतो त्याची तुलना कोणत्याही गोष्टीशी होवू शकत नाही असे प्रतिपादन मराठी ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत यांनी ‘तरूण भारत’शी बोलताना केले.
‘व्हॅक्युम क्लीनर’ या नाटकाच्या प्रयोगानिमित्त ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत या रत्नागिरीत आल्या आहेत. यावेळी त्यांनी ‘तरूण भारत’ शी मनमोकळेपणाने संवाद साधला. अभिनय क्षेत्रापलीकडे जावून आपल्या कौटुंबिक जीवनाबाबतही त्यांनी गप्पा मारल्या. यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक दिलीप जाधव हेदेखील उपस्थित होते.
जीवनात मेहनत, प्रामाणिकपणा असल्याशिवाय यशस्वी होता येत नाही, हे जरी खरे असले तरी कुटुंबाची साथ तितकीच मोलाची असल्याचे निर्मिती सावंत यांनी सांगितले. लहानपणापासून अभिनय क्षेत्राची आवड होती मात्र ही आवड राज्य नाटय़ स्पर्धेत काम करताना आणखीन वाढली. राज्य नाटय़ स्पर्धेत गंभीर भूमिकांबद्दल अनेक अवॉर्ड मिळाले आहे, प्रेक्षकांना मी विनोदी भूमिकेत जरी दिसत असले तरी मी अभिनय हे खूप मनापासुन करत असते माझ्यादृष्टीने तो एक अभिनय असतो पेक्षक वर्ग ठरतो की, तो अभिनय कोणत्या स्वरूपाचा आहे.
व्यावसायिक रंगभूमीवर काम करताना मला जे अभिनय देण्यात आले ते अभिनय प्रेक्षकांसाठी विनोदी ठरले. माझ्या अभिनयामुळे प्रेक्षक काही वेळ तणावमुक्त होतात मनापासून हसतात ही माझ्यासाठी माझ्या अभिनयाची पोचपावती असल्याचे निर्मिती यांनी सांगितले.
पडद्यावर काम करणे आणि प्रत्यक्षात रंगभूमीवर काम करण्यात खूप फरक असतो. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ हे अभिनयात टायमिंगचे बादशहा आहेत, त्यांच्यासोबत नाटकात पहिल्यांदाच काम करण्याची संधी मला मिळाली आहे. त्यांच्यासोबत काम करताना आपण कुठे अभिनयात कमी पडत नाही ना? यादृष्टीने परफेक्ट टायमिंगवर पकड लागते ते करण्यात मी यशस्वी होत आहे. व्हॅक्युम क्लीनर या नाटकाला सगळीकडे उत्तम प्रतिसाद मिळतोय, लॉकडाऊनच्या दोन दिवस आधी अमेरिकेत या नाटकाचे शो होणार होते मात्र लॉकडाऊनच्या प्रक्रियेमुळे आमचे जाण्याचे रद्द झाले त्यानंतर जवळपास वर्षभर आम्ही बाहेर पडलो नव्हतो.
आता या प्रयोगाच्या निमित्ताने पुन्हा बाहेर पडू लागलो असून प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता खूप चांगले वाटते, अभिनयाला प्रेक्षकांचा प्रतिसाद महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. जरी अलीकडे वेबसीरीज, चित्रपट, शॉर्टफिल्मचा जमाना असला तरी नाटकांना मिळणारा प्रतिसाद अद्यापही कमी झालेला नाही त्यामुळे नाटक पाहणारा एक वर्ग वेगळा आहे. त्यामुळे रंगभूमीचे महत्व कधी कमी होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
कोरोना काळात मी माझी आवड पूर्ण केली- निर्मिती सावंत
कोरोना काळात सुरूवातीला काय करावे हे कळत नव्हते मात्र मी या आठ नऊ महिन्याच्या कालावधीत बहुतांश पुस्तके वाचून काढली त्यानंतर दररोज चित्रपट पाहणे, वेबसीरीज पाहिले त्यामुळे खूप छान वाटले. मुळात आमचे एकत्र कुटुंब असून सगळय़ांबरोबर छानसा वेळ घालवता आला, गप्पा मारता आले. जरी वैयक्तीक आयुष्यात कोरोनामुळे आनंद घेता आला असला तरी यामुळे लाखों गरीबांचे मोठे नुकसान, हाल झाले. संपूर्ण चित्रपट सृष्टी थांबली होती.









