रघुराम राजन यांनी व्यक्त केली भीती
वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यस्थेची स्थिती वाईट आहे. जीडीपी दर उणे 23.9 टक्क्मयांनी घसरला आहे. याच पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी या आकडय़ावरून सर्वांनी सावध होणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. भारतीय अर्थव्यस्थेला अमेरिका आणि इटलीपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. इनफॉर्मल क्षेत्रातील आकडे जोडले जातील, तेव्हा अर्थव्यवस्थेतील घसरण अधिक वाईट असेल, असे भाष्य राजन यांनी आपल्या लिंक्डइन पेजवरील पोस्टमध्ये केले आहे.
कोरोनाचा प्रसार सध्या जगभर वेगाने होत आहे. भारतातही सध्या फार बिकट स्थिती आहे. जोपर्यंत विषाणूवर नियंत्रण मिळवले जात नाही तोपर्यंत भारतात विवेकी खर्चाची स्थिती कमकुवत असेल. सरकारने आतापर्यंत जो निधी दिला आहे, तो पुरेसा नाही. सरकार भविष्यात प्रोत्साहन पॅकेज देण्यासाठी आज संसधान वाचविण्याच्या रणनितीने चालत आहे, जे धोकादायक आहे. सरकारी अधिकारी कोरोनावर नियंत्रण मिळवल्यानंतर मदत निधी पॅकेज देता येईल, असा विचार करत आहेत. मात्र ते स्थितीला गंभीरतेने घेताना दिसत नाहीत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यश मिळत नसल्याने अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान सुरू आहे, असे राजन म्हणाले.
मदत निधीशिवाय लोक जेवण सोडून देतील, मुलांना शाळेतून काढतील आणि त्यांना काम करणे किंवा भीक मागण्यासाठी पाठवतील. कर्ज घेण्यासाठी सोने गहाण ठेवतील, ईएमआय आणि घराचे भाडे वाढत जाईल. कंपन्यांवरील कर्ज वाढल्यानंतर त्या देखील बंद होतील. जोपर्यंत व्हायरस निंयत्रणात येईल, तोपर्यंत अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झालेली असेल, अशी मोठी भीतीही रघुराम राजन यांनी व्यक्त केली आहे.









