नवी दिल्ली :
सप्टेंबरमध्ये वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलनात चांगली वृद्धी झाली आहे. सप्टेंबरमध्ये 95 हजार 480 कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाल्याची माहिती वित्त मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षातील सदरच्या महिन्यातील जीएसटी संकलन सर्वाधिक आहे.
दुसरीकडे वस्तूंच्या आयातीतून सप्टेंबर 2020 मध्ये मागच्या वर्षाच्या याच महिन्याच्या तुलनेत 102 टक्के अधिक कर जमा झाला आहे, तर स्थानिक व्यवहारांच्या माध्यमातून महसूल सदरच्या महिन्यात 105 टक्के जास्त जमा झाला आहे. सप्टेंबर महिन्यात एकूण जीएसटी संकलनापैकी महसुलाचा वाटा मागच्या वर्षाच्या याच महिन्याच्या तुलनेत 4 टक्के अधिक आहे. सप्टेंबर 2020 मध्ये स्थूल जीएसटी 95 हजार 480 कोटी रुपयांचा जमा झाला असून त्यात केंद्रीय जीएसटी 17 हजार 741 कोटी रुपये आणि राज्य जीएसटी 23 हजार 131 कोटी रुपये तसेच एकत्रित जीएसटी 47 हजार 484 कोटी (22 हजार 442 कोटी रुपये वस्तूंच्या आयातीसह) व सेस 7 हजार 124 कोटी रुपये यांचा वाटा आहे.









