नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जानेवारी महिन्यात 1.20 लाख कोटी रुपयांचे जीएसटी (वस्तू-सेवा कर) संकलन झाले आहे. डिसेंबर महिन्यापाठोपाठ जानेवारी महिन्यातील कर संकलनानेही नवा उच्चांक गाठल्याने समाधान व्यक्त होत आहे. जीएसटी करप्रणाली लागू झाल्यापासून आतापर्यंतचे हे विक्रमी करसंकलन ठरले आहे. संसदेत 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक वार्ता मिळाली आहे.
मागील वषी याच महिन्यात (जानेवारी 2020) जीएसटी संकलनाच्या तुलनेत सुमारे 10 हजार कोटींचा महसूल जास्त आहे. मागील महिन्यात (डिसेंबर 2020) 1.15 लाख कोटी रुपयांचा जीएसटी संग्रह झाला होता. त्यानंतर आता त्यातही 0.05 लाख कोटी रुपयांची भर पडल्याने करसंकलनाने 1.20 लाख कोटी हा सर्वोच्च आकडा गाठला आहे.
31 जानेवारी रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार 1 लाख 19 हजार 847 कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले आहे. त्यात 21 हजार 923 कोटी रुपयांचा सीजीएसटी आणि 29 हजार 014 कोटी रुपयांचा एसजीएसटी आहे. त्याचबरोबर आयजीएसटी 60 हजार 288 कोटी रुपये आहे.









