नूतन सेवाकर आयुक्तांना निवेदन : बेळगाव ट्रेडर्स फोरमच्यावतीने स्वागत, ‘हाय कॅपॅसिटी सर्व्हर’ची सुविधा देण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
जीएसटी कर भरण्याची प्रक्रिया सुलभ करावी, लेट फीचा परतावा ठराविक मुदतीत मिळावा, ‘हाय कॅपॅसिटी सर्व्हर’ उपलब्ध करून द्यावा, किरकोळ कारणास्तव जीएसटी आर-1 हा फॉर्म रद्दबातल करू नये, अशा विविध मागण्यांचे निवेदन ‘बेळगाव ट्रेडर्स फोरम’तर्फे नूतन सेवाकर आयुक्त बसवराज नलगावे यांना देण्यात आले.
फोरमचे अध्यक्ष सतीश तेंडोलकर, सीए वीरसिंग भोसले, सीए राजेंद्र जोशी तसेच उद्योजक सेवंतीलाल शाह यांनी त्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी झालेल्या चर्चेत फोरमने स्पष्ट केले की, चार वर्षांनंतर बेळगावला नूतन केंद्रीय वस्तू व सेवाकर आयुक्त लाभले आहेत. जीएसटी प्रणाली 2017 मध्ये अंमलात आली. परंतु त्यामध्ये सतत बदल होत गेले. त्यामुळे करप्रणालीशी जुळवून घेताना त्यामध्ये असंख्य बदल करावे लागले. व्यापारी, उद्योजक यांना दर महिन्याला काहीना काही समस्या भेडसावत आहेत.
‘लेट फी’चा मुद्दा महत्त्वाचा असून ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तो वेळेवर अपलोड झाला नाही तर लेट फी लावली जाते. काहीवेळा करदात्यांकडूनही विलंब होतो. तथापि, त्याचा परतावा मिळतो. हे जरी खरे असले तरी तो परतावा मिळण्यासाठी ठराविक कालावधी निश्चित करावा. जेणेकरून उद्योजक आणि व्यापारी यांचे भांडवल गुंतून पडणार नाही व त्यांना हा पैसा आपल्या व्यापारासाठी वापरता येईल.
‘हाय कॅपॅसिटी सर्व्हर’ची सुविधा द्या
जीएसटीचा फॉर्म भरण्यासाठी ठराविक तारखा देण्यात आल्या आहेत. फॉर्म तीन ते चार मिनिटांत भरून होतो. पण तो अपलोड होत नाही. करदात्यांची संख्या वाढली आहे. त्या तुलनेत संगणकीय क्षमता वाढू शकली नाही. यासाठी जीएसटी खात्याने ‘हाय कॅपॅसिटी सर्व्हर’ची सुविधा त्वरित दिली पाहिजे. या शिवाय प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग करून मोबाईलद्वारेसुद्धा हा फॉर्म अपलोड करता यावा, यासाठी प्रयत्न करावेत, असेही फोरमच्या सदस्यांनी स्पष्ट केले.
जीएसटी आर-1 हा फॉर्म अपलोड करताना प्रत्येक टप्प्यावर त्याची वैधता पडताळली जाते. त्यासाठी किमान दोन ते तीन तास लागतात. परंतु किरकोळ कारणास्तव तो रद्दबातल केला जातो. त्यामुळे वेळ आणि श्रम निष्कारण खर्ची पडतात. यासाठी जीएसटी आर-1 हा फॉर्म भरला नसेल तोपर्यंत जीएसटी आर थ्रीबी कार्यान्वित करू नये, अशी मागणीही सदस्यांनी केली.
त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्नशील
चर्चेनंतर नलगावे यांनी या सर्व त्रुटींची आपल्याला कल्पना आहे. सरकार या त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे सांगितले. शिवाय आज आपण सर्व अधिकाऱयांची तातडीची बैठक घेऊन व्यापारी व उद्योजक यांच्या समस्या जाणून घ्या व त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील रहा, अशा सूचना केल्या आहेत. परंतु कर भरण्यास हेतूतः विलंब करणाऱयांची गय केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान फोरमने सदर निवेदनाची प्रत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनाही पाठविली आहे.









