किरण ठाकुर यांचे प्रतिपादन : बेळगाव प्रेस ओनर्स असोसिएशनचा स्नेहमेळावा
प्रतिनिधी /बेळगाव
जीएसटीमुळे मुद्रण क्षेत्राला फटका बसला असून हे क्षेत्र अनेक अडचणींतून वाटचाल करत आहे. याबद्दल आता मुद्रण क्षेत्रातील लोकांनी आवाज उठविला पाहिजे. वृत्तपत्र छपाईदारांबरोबर इतर सर्व छपाईदारांनी शासनावर दबाव आणून जीएसटी कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशी अपेक्षा तरुण भारतचे समूहप्रमुख, सल्लागार संपादक व एसकेई सोसायटीचे चेअरमन किरण ठाकुर यांनी क्यक्त केली. द बेळगाव प्रेस ओनर्स असोसिएशनचा मंगळवारी कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिरात स्नेहमेळावा झाला. यावेळी ठाकुर बोलत होते.
यावेळी किरण ठाकुर यांची साऊथ कोकण एज्युकेशन सोसायटीच्या (एसकेई) चेअरमनपदी तर मधुकर सामंत यांची सचिवपदी निवड झाल्याबद्दल असोसिएशनतर्फे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
किरण ठाकुर पुढे म्हणाले, साऊथ कोकण एज्युकेशन सोसायटी ही बेळगावातील फार जुनी संस्था आहे. कोकणात चांगल्या शिक्षणाची सोय व्हावी, याकरिता पहिल्यांदा ही संस्था कोकणात सुरू झाली. दरम्यान कोकणात मलेरियाची साथ आल्याने संस्थेला विद्यार्थी मिळेनासे झाले. दरम्यानच्या काळात बेळगावातदेखील कॉलेजची गरज होती. त्यावेळी माझ्या वडिलांनी काही सहकाऱयांच्या मदतीने परवानगी मिळवून बेळगावात ही संस्था सुरू केली. सुरुवातीच्या काळात ही संस्था चालविणे अवघड होते. त्यावेळी अनेकांच्या मदतीने वाटचाल सुरू होती आणि आज या संस्थेची भरभराट झाल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पांडुरंग बळी हे बेळगाव प्रेस ओनर्स असोसिएशनचे नवीन सभासद झाल्याबद्दल त्यांचाही पुष्प देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष श्रीधर (बापू) जाधव, सचिव श्याम मांगले, उपसचिव संतोष होर्टीकर, संचालक सतीश जाधव, अशोक धोंड, नंदकुमार देशपांडे, विलास सावगावकर, रघुनाथ राणे, अजित कोळेकर, सर्वज्ञ कपिलेश्वरी, शिवाजी बाडीवाले, अनिल गोडसे, अरुण पाटील यांसह इतर उपस्थित होते. उपाध्यक्ष राजेंद्र भातकांडे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.









