स्वायत्त दर्जा देण्याबाबत कॉलेजची केली पाहणी
प्रतिनिधी /बेळगाव
एसकेई सोसायटीचे गोविंदराम सक्सेरिया सायन्स कॉलेज हे बेळगावातील एक नामवंत कॉलेज आहे. उत्तम शैक्षणिक दर्जा, कुशल आणि दर्जेदार स्टाफ, भव्य कँपस, अद्ययावत प्रयोगशाळांसह सर्व सोयी-सुविधांनी उपलब्ध अशा इमारती इत्यादी अनेक गोष्टींसाठी हे कॉलेज संपूर्ण उत्तर कर्नाटकात प्रसिद्ध आहे. म्हणूनच यावर्षी कॉलेजने स्वायत्त दर्जासाठी युजीसीकडे अर्ज दाखल केला होता. या मागणीनुसार दि. 28 व 29 ऑक्टोबर रोजी युजीसी कमिटीने कॉलेजला भेट दिली व कॉलेजच्या सर्वांगीण विकासाची पाहणी केली. डॉ. भरत सिंग, प्राध्यापक रिषी भरत्रीहरी मत्स्य विद्यालय कोटा यांनी चेअरमनपद भूषविले. प्रा. हॅरेल थॉमस, डॉ. एच. एस. गोर विश्वविद्यालय सागर, डॉ. पंडियाराजन एएनजेए कॉलेज शिवकाशी, राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटीचे प्रा. शिवानंद गोरनाळे, कॉलेजीएट एज्युकेशन जेटी. डायरेक्टर हनुमंतय्या व युजीसी सेक्टर ऑफीसर अजय जोशी हे पाच मेंबर होते.
या कमिटीने दोन दिवस कॉलेजच्या सर्व विभागांची पाहणी केली. कॉलेजचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी या सर्वांशी संवाद साधला. कॉलेजच्या सर्वांगीण विकासाबद्दल एसकेई सोसायटीचे कौतुक केले.
एक्झिट मीटिंगमध्ये युजीसी कमिटी चेअरमन डॉ. भरत सिंग यांनी आपल्या भाषणात सांगितले की, गोविंदराम सक्सेरिया सायन्स कॉलेज हे अतिशय स्वच्छ, सुंदर कॅम्पस, उत्तम शैक्षणिक दर्जा, उत्तम संचालक मंडळ या सर्व दृष्टीने सुविद्य आहे.
कॉलेजचे ग्रंथालय व बोटॅनिकल गार्डन याबद्दलही त्यांनी खास प्रशंसा क्यक्त केली. कॉलेजने दाखविलेल्या आदरातिथ्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
या कमिटीसाठी कॉलेजने करमणुकीचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी एसकेई सोसायटीचे नूतन चेअरमन किरण ठाकुर यांनी युजीसी कमिटीच्या सर्व सभासदांचा सत्कार केला. त्यानंतर जुन्या-नव्या गाण्यांचा ऑर्केस्ट्रा, कथ्थक नृत्य, भरतनाटय़म असा विविध भरगच्च कार्यक्रम सादर करण्यात आला. कमिटीने या कार्यक्रमाचेही तोंडभरून कौतुक केले. कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व कलाकारांचाही किरण ठाकुर यांनी सत्कार केला.
दोन दिवस झालेल्या या पाहणीचा अहवाल युजीसीकडे दाखल केला जाईल. त्यानंतर कॉलेजला स्वायत्त दर्जा प्राप्त होण्याबद्दल प्रमाणपत्र दिले जाईल.
स्वायत्त दर्जा प्राप्त झाल्यानंतर आपला अभ्यासक्रम, परीक्षांचे स्वरुप, रिसर्च, इतर शैक्षणिक कार्यक्रम ठरविण्याचे स्वातंत्र्य मिळेल व बेळगावातील पुढच्या पिढीला निश्चित याचा फायदा होईल, असे सांगण्यात आले.









