प्रतिनिधी/बेळगाव :
साऊथ कोकण एज्युकेशन सोसायटी संचालित जीएसएस कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन गुरुवारी उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंकज शिवलकर होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सुनील आपटेकर, एसकेई सोसायटीचे अध्यक्ष सेवंतीलाल शाह, व्हा. चेअरमन ज्ञानेश कलघटगी, प्राचार्य प्रणव पित्रे, व्हा. प्राचार्य अनिल खांडेकर, शारीरिक विभाग प्रमुख विनय नाईक, विद्यार्थी प्रतिनिधी रक्षा प्रभू उपस्थित होते.
प्रारंभी तन्मयी सराफ हिने स्वागतगीत सादर केले. प्राचार्य प्रणव पित्रे यांनी स्वागत केले. प्रा. कीर्ती फडके यांनी परिचय करून दिला. उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे सुनील आपटेकर म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्यांची वृत्ती ही मूळतः सकारात्मक असते. मात्र सभोवतालच्या वातावरणामुळे त्यांच्यामध्ये नाकारात्मक बदल दिसू लागतात. यातून बाहेर पडण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः सकारात्मक राहणे गरजेचे आहे. आत्मविश्वास व स्वबळाच्या जोरावर चांगले ध्येय गाठू शकतो. त्यामुळे सकारात्मक विचार व चांगल्या माणसांची संगत करून यशस्वी व्हा. शिक्षणाबरोबर आरोग्याकडे लक्ष देऊन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षणात भरारी घ्या, असे सांगितले.
यावेळी वर्षभरातील कार्याची क्षणचित्रे चित्रफितीद्वारे दाखविण्यात आली. प्रा. अनिल खांडेकर यांनी अहवाल सादर केला. यावेळी राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा, कराटे, बुद्धिबळ, टेनिस, ऍथलेटिक्स, नेटबॉल, स्विमिंग, बॅटमिंटन, योग आदी स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, चषक व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच कॉलेजतर्फे घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले.
यावेळी यावषीचा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून व्हारंट वेगस तर सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी म्हणून रक्षा प्रभू यांची निवड केली गेली. त्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. रेश्मा सप्ले, प्रा. शुभदा मनगोळ, साक्षी कुलकर्णी यांनी केले. रक्षा प्रभू हिने आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. याप्रसंगी विद्यार्थी, प्राध्यापक बहुसंख्येने उपस्थित होते.









