प्रतिनिधी /पणजी
प्लंबिंग क्षेत्रातील विद्यार्थ्यांमधील कौशल्य आणि ज्ञानवाढीस मदत होण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय आणि इंडियन प्लंबिंग असोसिएशन यांच्यात सामंजस्य करार घडवून आणला आहे.
या कराराच्या माध्यमातून दोन्ही संस्थांना त्यांच्या संबंधित क्षेत्रात उपयुक्त ठरेल असे अत्याधुनिक तंत्रग्नज्ञान व माहितीचे आदानप्रदान करणे शक्य होईल, असे त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या हितासाठी एकत्र काम करा, कार्यक्रमांचे आयोजन करा, त्याचबरोबर सुरक्षित ’प्लंबिंग स्टँडर्स’च्या माध्यमातून जल, मलनिस्सारण, जलसंवर्धन, उर्जा, तसेच पर्यावरण संरक्षण यासारख्या राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने महत्वाच्या विषयांवरही संयुक्तपणे काम करा, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दोन्ही संस्थांच्या प्रतिनिधींना दिला.
भारतीय प्लंबिंग संघटना आणि गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाद्वारे संचलित सेंटर फॉर इंटरनॅशनल प्लंबिंग प्रॅक्टिसीस विद्यार्थ्यांना भेट देण्यासाठी खुल्या आहेत. सामंजस्य करारांतर्गत लवकरच दोन्ही संस्थांतर्फे प्लंबिंग लॅबोरेटरीज स्थापन करण्यात येणार आहे.पर्वरी सचिवालयात शुक्रवारी झालेल्या या कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांसह मुख्य सचिव परिमल राय आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.









