प्रतिनिधी /बेळगाव
जीआयटी बेळगावतर्फे व्हीटीयूच्या सहकार्याने नूतन शैक्षणिक धोरण-2020 या विषयावर दोन दिवसांची कार्यशाळा जीआयटीच्या सभागृहात घेण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून व्हिटीयूचे कुलगुरू डॉ. करिसिद्धप्पा तर निमंत्रित म्हणून व्हिटीयूचे कुलसचिव डॉ. ए. एस. देशपांडे, डॉ. बी. ई. रंगास्वामी उपस्थित होते. कार्यकारी मंडळाचे सदस्य राजेंद्र बेळगावकर अध्यक्षस्थानी होते.
यावेळी बोलताना डॉ. करिसिद्धप्पा म्हणाले, संपूर्ण देश सध्या शैक्षणिक क्रांतीच्या वाटेवर आहे. हे धोरण पुन्हा एकदा नव्याने शैक्षणिक पद्धतीची पुनर्रचना करणारे ठरणार आहे. आजच्या काळात प्राध्यापकांनी चारित्र्यवान आणि व्यावसायिक विद्यार्थी घडविणे आवश्यक आहे. शिक्षणाला मूल्यांची जोड आवश्यक असून त्यावर प्राध्यापकांनी भर दिला पाहिजे. डॉ. ए. एस. देशपांडे यांनी नवीन शैक्षणिक धोरणवर मत मांडले. डॉ. बी. ई. रंगास्वामी यांनी नूतन शैक्षणिक धोरणांतर्गत परीक्षा आणि गुणांचे मूल्यांकन कसे असेल याबद्दल माहिती दिली. राजेंद्र बेळगावकर यांनी विद्यार्थ्यांचे मूल्यांकन आता अधिक पारदर्शक पद्धतीने होईल, असा विश्वास व्यक्त केला. प्राचार्य डॉ. जयंत कित्तूर यांनी स्वागत तर. डॉ. संजीव इंगळगी यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. डॉ. वाणी हुंडेकर यांनी सूत्रसंचालन तर डॉ. राजेंद्र इनामदार यांनी या सत्राचे संचलन केले. डॉ. कृष्णा शेखरलाल दास यांनी आभार मानले.









