वार्ताहर / सावंतवाडी:
जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी सावंतवाडी तालुक्यात सांगेली, सावरवाड, वेर्ले गावातील ग्रामपंचायती, शाळांना भेटी दिल्या. सावरवाड प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांचा वर्ग घेतला. काही काळासाठी ते शिक्षक बनले. सावंतवाडी पचायत समितीत डॉ. वसेकर यांनी जलव्यस्थापनाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी सांगेली, सावरवाड आणि वेर्ले गावातील ग्रामपंचायतीला भेट दिली. सावरवाड ग्रा. पं. च्या कारभाराचे त्यांनी कौतुक केले. सरपंच सुप्रिया मडगावकर, ग्रामसेविका बगळे यांनी त्यांचे स्वागत केले.
डॉ. वसेकर यांनी सावरवाड गावातील शाळेला भेट दिली. कोरोना महामारीमुळे गेले दहा महिने शाळा बंद होत्या. आता आठवडाभरापूर्वी शाळा सुरू झाल्या. त्यामुळे त्यांनी शाळेला भेट देत विद्यार्थ्यांचा वर्ग घेतला. सावरवाड शाळेचे बदललेले रुप आणि बोलक्या भिंती याबद्दल त्यांनी शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षिका आदिती चव्हाण यांचे कौतुक केले. यावेळी त्यांनी सावरवाड ग्रा. पं. च्या नवीन इमारतीची पाहणी केली. सांगेली ग्रा. पं. लाही त्यांनी भेट दिली. यावेळी सरपंच डॉ. मनस्वी राऊळ, गटविकास अधिकारी व्ही. एम. नाईक, उपअभियंता रमेश मठकर उपस्थित होते. सांगेली प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इमारत कामाचीही त्यांनी पाहणी केली. तसेच वेर्ले येथील पेयजल योजनेच्या कामाचीही पाहणी केली. यावेळी सरपंच सुरेश राऊळ उपस्थित होते.









