माजी आरोग्य सभापती डॉ. अनिशा दळवींसह आयुष, होमिओपॅथी डॉक्टरांनी वेधले लक्ष
प्रतिनिधी / ओरोस:
जिल्हय़ात एम. बी. बी. एस. डॉक्टर येण्यास तयार होत नसल्याने येथील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी आयुर्वेदिकबरोबरच होमिओपॅथी डॉक्टरांची पदभरती करून आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घ्यावा, अशी मागणी माजी आरोग्य सभापती आणि जि. प. चे विद्यमान सदस्य डॉ. अनिशा दळवी यांनी जि. प. अध्यक्ष समिधा नाईक यांच्याकडे केली आहे.
गणेशोत्सव काळात जिल्हय़ात सुमारे दोन लाख नागरिक मुंबई, पुणे व महाराष्ट्राच्या अन्य भागातून येण्याचा अंदाज आहे. जिल्हय़ातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील गेल्या तीन महिन्यांतील ताण लक्षात घेता कोविड केअर सेंटरच्या सक्षमीकरणाची गरज आहेच. त्याचबरोबर आरोग्य यंत्रणेतील मनुष्यबळ वाढवून या कोरोना साथ रोग काळात आरोग्य यंत्रणा सक्षम करणे गरजेचे असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
यावेळी डॉ. प्रवीण सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे कणकवली विधानसभा अध्यक्ष डॉ. अभिनंदन मालंडकर, राष्ट्रवादी मालवण तालुका अध्यक्ष डॉ. विश्वास साठे आदी उपस्थित हेते.
शासनाने 20 एप्रिलच्या पत्राद्वारे होमिओपॅथिक डॉक्टरना आयुर्वेद व युनानी डॉक्टरांसमवेत रिक्त पदावर आयुष वैद्यकीय अधिकारी म्हणून संधी द्यावी, असे सूचित केले आहे. महाराष्ट्र बृहन्मुंबई महानगर पालिका व सर्व महानगरपालिकांमध्ये आयुष डॉक्टर व आरोग्य यंत्रणेतील आवश्यक मनुष्यबळाची पदभरती करण्यात आली. ही कंत्राटी भरती कोविड 19 महामारी काळापुरती असली, तरी या मनुष्यबळाचा सक्षम उपयोग झाला आहे. महाराष्ट्रात पुणे, जळगाव, चंद्रपूर जिल्हा परिषदांनी होमिओपॅथिक डॉक्टरांना आयुष डॉक्टरांच्या पद भरतीमध्ये संधी दिली असल्याची बाब निदर्शनास आणून दिली.
सिंधुदुर्ग जि. प. ने तशाच पद्धतीने आपल्या उपकेंद्र स्तरावर व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या रिक्त पदांची किमान कोरोना काळासाठी भरती प्रक्रिया राबवावी. जेणेकरून गणेशोत्सव काळात आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होऊ शकेल. जिल्हय़ात 90 टक्के फॅमिली फिजिशियन, जनरल पॅक्टिशनर हे होमिओपॅथिक व आयुर्वेदिक पदवीधर आहेत. यापूर्वी तीनवेळा झालेल्या कंत्राटी भरती प्रक्रियेत एम. बी. बी. एस. डॉक्टर हे शासन सेवा देण्यास तयार नाहीत. सिंधुदुर्गात पाच टक्के सुद्धा अर्ज हे या डॉक्टरसाठीच्या पदांकरिता येत नाहीत, असे चित्र आहे. त्यामुळे काळाची गरज ओळखून आयुर्वेदिक व होमिओपॅथिक डॉक्टरांच्या पदांची भरती प्रक्रिया जि. प. च्या पुढाकाराने व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा शल्यचिकित्सक, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊनही याबाबतचे निवेदन देण्यात आले.









