कोल्हापूर / प्रतिनिधी
ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेतील गट क आणि ड मधील कर्मचाऱयांची 15 टक्के मर्यादेपर्यंत बदली करण्याची परवानगी दिली आहे. यामध्ये प्रशासकीय बदल्या 7.5 टक्के व विनंती बदल्या 7.5 टक्के होणार आहेत. त्यानुसार जि.प.मध्ये बदल्यांची लगबग सुरु असून 14 जुलैपर्यंत 305 अर्ज प्राप्त झाले आहेत. 16 जुलै रोजी बदलीसाठी संवर्गनिहाय अंतरिम एकत्रित वास्तव्य सेवा ज्येष्ठता याद्या तयार करून प्रसिद्ध केल्या आहेत. अंतरिम सेवाज्येष्ठता यादीवर 17 ते 20 जुलै या दरम्यान सूचना मागविल्या जाणार आहेत. तर 21 जुलै रोजी सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
जि.प.कडे प्राप्त झालेल्या अर्जामध्ये सामान्य प्रशासन विभाग 94, ग्रामपंचायत विभाग 82, प्राथमिक शिक्षण विभाग 06, आरोग्य विभाग 53, वित्त विभाग 08, महिला व बालकल्याण विभाग 14, बांधकाम विभाग 23, पशुसंवर्धन विभाग 10, कृषि विभाग 15 असे एकूण 305 अर्ज प्राप्त झाले आहे.
23 जुलै रोजी जि.प.चे समिती सभागृह आणि कागलकर हाऊसमध्ये 10.30 ते 1 या वेळेत सामान्य प्रशासन विभागाकडील, दुपारी 2 ते 4 या वेळेत ग्रा.प.विभागाकडील तर 4 ते 5.30 या वेळेत प्राथमिक शिक्षण विभागाकडील सर्व संवर्गातील कर्मचाऱयांची बदली होणार आहे. 24 जुलै रोजी सकाळी 10.30 ते 12 या वेळेत आरोग्य विभाग, 12 ते 1.30 दरम्यान अर्थ विभाग, 2.30 ते 3 या वेळेत एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभाग, दुपारी 3 ते 4 बांधकाम विभाग, 4 ते 5.30 वाजता पशुसंवर्धन व कृषि विभागाकडील समुपदेशाने बदल्या होणार आहेत. 30 ते 31 जुलै रोजी पंचायत समिती स्तरावरील बदलीपात्र संवर्गातील सर्व संवर्गाची बदली होणार आहे.








