भटक्या कुत्र्यांनी मांडला जिल्हा पंचायतमध्ये ठिय्या, अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे संताप
बेळगाव : जिल्ह्यातील विकासकामे करण्यासाठी जिल्हा पंचायत कार्यालय असते. त्यामुळे जिल्ह्यातील उलाढाल आणि नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी त्या सोडविण्यासाठी अनेक नागरिक जिल्हा पंचायतीच्या पायऱ्या झिजवतात. अनेकांची कामे होतात तर अनेकांना रिकाम्या हाती परतावे लागते. त्यामुळे अनेकवेळा नागरिकांना जिल्हा पंचायतीच्या वाऱ्या कराव्या लागतात. मात्र आता तर जिल्हा पंचायतीच्या दारी कुत्र्यांच्याही वाऱ्या होवू लागल्या आहेत. कुत्र्यांनी मंगळवारी जिल्हा पंचायतसमोर ठिय्या आंदोलनच मांडले की काय? असा प्रकार पहावयास मिळाला. त्यामुळे महानगरपालिकेने राबविलेली मोहीम पुन्हा एकदा फोल ठरल्याचेच दिसून येत आहे. मंगळवारी नागरिक कामासाठी जिल्हा पंचायतकडे ये-जा करत होते. दरम्यान याच काळात जिल्हा पंचायतीच्या आवारात भटक्या कुत्र्यांनी आपला मोर्चा वळविला होता. ध्वजस्तंभावरच त्यांनी विश्रांती घेतली होती. हा प्रकार अधिकाऱ्यांच्याही लक्षात आला नसेल का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. एकीकडे भटक्या कुत्र्यांचा उपद्रव तर दुसरीकडे त्यांचा वाढता वावर अनेकांना त्रासदायक ठरु लागला आहे. त्यामुळे याकडे आता गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे. बेळगाव जिल्हा पंचायतबरोबरच अनेक सरकारी कार्यालयात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात येत आहे. भटक्या कुत्र्यांसंदर्भात नुकतीच महानगरपालिकेने मोहीम राबविली होती. मात्र ती कितपत यशस्वी झाली? हा संशय आहे. कारण अनेक सरकारी कार्यालयांत भटक्या कुत्र्यांचा वावर वाढतच चालला आहे. त्यामुळे यांचा बंदोबस्त करण्यासाठी पुन्हा पाऊल उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.
बेळगाव शहर तसेच ग्रामीण भागातही भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. नागरिकांवर कुत्री हल्ले करण्याचे प्रकारही वाढीस लागले आहेत. तर लहान मुलांना जीव मुठीत घेवून जावे लागत आहे. त्यामुळे शहराबरोबरच तालुक्यातही भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे. असे असताना आता मंगळवारी जिल्हा पंचायतसमोरच भटक्या कुत्र्यांनी ठिय्या मांडल्याचे चित्र पहावयास मिळाले. यासाठी आता जिल्हा पंचायतीच्या अधिकाऱ्यांनी तरी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.









