तेरा महिन्यात सर्वाधिक 3632 डिस्चार्ज
प्रतिनिधी/ सातारा
शुक्रवारचा दिवस जिह्याला मोठा दिलासा देणारा ठरला. एका दिवसात 3 हजार 632 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. गेल्या तेरा महिन्यातील ही उच्चांकी कोरोनामुक्ती आहे. यामुळे 24 हजारावर गेलेले सक्रिय रुग्ण प्रमाण कमी होऊ लागले आहे. संसर्ग वाढत असल्याने त्रासलेल्या जिल्हावसियाना यामुळे दिलासा मिळाला आहे.
दरम्यान आज सकाळी आलेल्या अहवालात 2110 जण बाधित आले असून 44 मृत्यूची नोंद झाली आहे.
सद्यःस्थितीतील निर्बंध 1 जून पर्यंत वाढविले
जिह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा जिह्यातील सद्यस्थितीत लागू असलेले निर्बंध 1 जून रोजी सकाळी 7.00 वाजेपर्यंत वाढविण्यात आली असल्याचे आदेश जारी केले आहेत. यामुळे कोणतीही नवी सवलत मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधितांनी टाळाटाळ केल्यास अथवाविरोध दर्शविल्यास संबंधितां विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 अनुसार तसेच भरतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय व कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
लॉक डाऊन कडकच; शटर राहणार बंद
राज्य शासनाने 1 जूनपर्यंत लॉक डाऊन वाढवताना सकाळी 7 ते 11 या वेळेत अत्यावश्यक सेवेची दुकाने उघडता येतील, अशी सवलत दिली होती. मात्र सातारा जिह्यात संसर्ग वाढत असल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिह्यात कोणतीही सवलत न देता सध्या असणारा कडक लॉक डाऊन 1 जूनपर्यंत कायम ठेवला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील दुकानांनाही घरपोच सेवा द्यावी लागणार आहे.
2110 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित
जिह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2110 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे. यात सर्वाधिक रुग्ण सातारा तालुक्यात नोंद झाले आहेत.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे – जावली 106 (6340), कराड 206 (19189), खंडाळा 134 (8263), खटाव 191 (11713), कोरेगांव 188 (11409),माण 140 (8915), महाबळेश्वर 55 (3636), पाटण 114 (5523), फलटण 277 (17756), सातारा 461 (29915), वाई 221 (9842 ) व इतर 17 (770) असे आज अखेर एकूण 133271 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
44 जणांचा मृत्यू
गेल्या चोवीस तासात 44 बाधित नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यात सर्वाधिक 14 मृत्यू सातारा तर 11 मृत्यू कराड तालुक्यातील आहेत.
आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे-जावली 4 (139), कराड 11 (544), खंडाळा 0 (107), खटाव 4 (321), कोरेगांव 0 (271), माण 5 (174), महाबळेश्वर 0 (40), पाटण 1 (134), फलटण 3 (228), सातारा 14 (885), वाई 2 (262) , व इतर 0 असा आज अखेर जिह्यामध्ये एकूण 3105 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
कोविशील्ड लसीचा दुसरा डोस पुन्हा लांबणीवर
कोविशिल्ड लशीच्या दुस्रया डोससाठी नागरिक धावपळ करत असताना हा डोस आणखी लांबणीवर पडला आहे.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार ज्या नागरिकांनी पूर्वी कोविशील्डचा पाहिला डोस घेतला आहे. त्यांना 15 मेपासून कोविशील्ड या लसीचा दुसरा डोस हा 12 ते 16 आठवडय़ाच्या दरम्यान (84 ते 112 दिवस ) देण्यात येणार आहे. याबाबतचा बदल कोविन ?प मध्ये 14 मे च्या मध्यरात्री पासून करण्यात येणार आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी सांगितले.








