832 बाधित, 34 जणांचा मृत्यू
प्रतिनिधी/ सातारा
जिल्हय़ातील कोरोना संसर्ग कमी होण्यास तयार नाही तर मृत्यूदरही वाढत असल्याने जिल्हय़ाची परिस्थिती विदारक झालेली आहे. यामध्ये कराड, साताऱयातील तीन अंकी वाढ थांबण्यास तयार नाही तर इतर तालुक्यात वेग मंदावला असला तरी दोन अंकी संख्येने वाढ सुरुच आहे. फक्त महाबळेश्वर तालुका गेल्या काही दिवसांपासून एक अंकी संख्येवर आल्याचा दिलासा सोडल्यास बाधित वाढ व वाढता मृत्यूदर पाहता नागरिकांमध्ये भीती निर्माण होत आहे. कोणाच्या खांद्यावर विश्वासाने मान टाकावी, असा प्रश्न जिल्हावासियांना पडला आहे. कधी दिलासा, कधी भीती अन डोक्यावर पडणारा पाऊस अशा हिदोंळय़ावर नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे.
दरम्यान, जिह्यात सोमवारी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार 862 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 34 बाधितांचा मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी 628 जणांना घरी सोडले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिलीय.
रविवार कमी अन इतर दिवशी पुन्हा वाढ
मध्यंतरी कोरोनामुक्तीचा वेग वाढीपेक्षा दुप्पट होता. मात्र तोही आता कमी झाला आहे. रविवारी कोरोनाचा वेग अल्प कमी येतो, मात्र नंतर इतर दिवशी तीन अंकी वाढीचा रतीब सुरुच राहतोय. त्यातच मृत्यूची आकडेवारी नागरिकांच्या मनात भय निर्माण करत आहे. सगळे मृत्यू दवाखान्यातच होत असल्याचे वास्तव नागरिकांना अस्वस्थ करत आहे. कोरोनामुळे एकाचा सुध्दा घरी मृत्यू झाल्याची घटना नसल्याची चर्चा नागरिकात आहे. वाढता मृत्यूदर न रोखता येणे याची जबाबदारी कोणी घेणार आहे की नाही ?
लोकप्रतिनिधींच्या तोंडावर देखील बोटच
जिल्हय़ातील ही एकूण स्थिती पाहता आणि कराड व सातारा तालुक्यांमधील वाढ पाहता यावर नेमकी काय उपाययोजना करावी याबाबत प्रशासनाकडूनही अधिकृतरित्या काही सांगितले जात नाही. तर लोकप्रतिनिधींनी तोंडावर बोट ठेवून परिस्थितीकडे उघडय़ा डोळय़ाने पाहत बसणे पसंत केले आहे. त्यातच तिसऱया लाटेची भीती घातली जात असल्याचा संतापही लोक व्यक्त करत आहेत. पहिल्यांदा ज्येष्ठ, नंतर तरुण आणि आता लहान मुले असे विभाजन करुन कोरोना येत असेल यावर आता लोकांचा विश्वास नाही.
कराड, सातारा, खटावात वाढ
रविवारीच्या अहवालात नेहमीप्रमाणे बाधितांचा आकडा घटला आणि सोमवारपासून पुन्हा 800 पटीत वाढीचा रतीब सुरु झाला. यामध्ये कराड, सातारा, खटाव तालुक्यात तीन अंकी संख्येने वाढ झाली आहे. तर महाबळेश्वरमध्ये केवळ 3 बाधित समोर आले असून इतर सात तालुक्यात दोन अंकी संख्येने वाढ झालेली आहे. यामध्ये खंडाळा, जावली व पाटणमध्ये वेग दिलासादायकरित्या मंदावला आहे. महाबळेश्वरची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरु आहे.
832 जणांचा अहवाल बाधित
सोमवारच्या अहवालानुसार तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. कराड 246 (32,668), सातारा 124 (43556), खटाव 104 (20940), माण 94 (14,058), फलटण 77 (29,713), वाई 75 (13,737), कोरेगाव 50 (18,241), खंडाळा 28 (12,556), जावली 26 (9,086), पाटण 18 (9,339), महाबळेश्वर 3 (4,436) व इतर 17 (1562) असे आज अखेर एकूण 209892 नागरिकांचे अहवाल बाधित आहेत.
कराडत 12, साताऱयात 9 मृत्यू
सोमवारी अहवालानुसार मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. कराड 12 (990), सातारा 9 (1,290), खटाव 4 (499), जावली 3 (191), कोरेगाव 3 (396), खंडाळा 0 (158), माण 1 (290), महाबळेश्वर 0 (85), पाटण 1 (316), फलटण 0 (491), वाई 1 (311) व इतर 0 (71), असे आज अखेर जिह्यामध्ये एकूण 5088 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
मंगळवारी 4,357 जणांचे लसीकरण
जिल्हय़ात शासनाकडून ज्या पध्दतीने पुरवठा होईल तसे लसीकरण सुरु आहे. पहिल्या टप्प्याती वेग आता राहिलेला नाही. मात्र, मंगळवारी 4 हजार 357 जणांना लस देण्यात आली आहे. त्यामुळे पहिला डोस घेणाऱया नागरिकांची संख्या 8 लाख 52 हजार 196 एवढी झाली आहे तर दुसरा डोस घेणाऱया नागरिकांची संख्या 2 लाख 79 हजार 133 असे मिळून आतापर्यंत जिल्हय़ातील 11 लाख 31 हजार 329 जण लसीकरणाचे लाभार्थी ठरले आहेत.
तिसऱया लाटेवर कडवट प्रतिक्रिया
राज्यात एकीकडे दुसरी लाट संपण्याची चिन्हे निर्माण होत असताना आरोग्य मंत्री राजेश टोपे देखील तिसऱया लाटेचा अंदाज व्यक्त करत आहेत. याबाबत सोशल मिडियावरील त्यांच्या याबाबतच्या वृत्तावर नागरिकांनी अत्यंत कडवट प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. आरोग्य मंत्री ज्योतिषी केव्हा झाले इथपासून पहिल्यांदा सर्व मंत्र्यांना कोरोना झाला पाहिजे असेही थेट आघात आहेत. एकूणच राज्यभरातील नागरिकांच्या मनात या कोरोनाच्या एकूणच स्थितीबद्दल सांशकता निर्माण झाली असल्याचे या प्रतिक्रियांमधून जाणवत आहे.
मंगळवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमूने 12,83,860
एकूण बाधित 209892
एकूण कोरोनामुक्त 1,97,556
मृत्यू 5,088
उपचारार्थ रुग्ण 9,318
मंगळवारी जिल्हय़ात
बाधित 832
मुक्त 628
मृत्यू 34








