प्रतिनिधी/ सातारा
कोरोनाच्या पाठोपाठ आता थंडीचा जोर कमी-जास्त होत आहे. चार दिवसांपूर्वी किमान तापमान 12 अंशापर्यंत खाली आलेले होते. दोन दिवस ऊन, सावलीचा खेळ सुरू होता. रविवारी मात्र दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. थंडीचे प्रमाण कमी झाले. मात्र या ढगाळ वातावरणामुळे शेतकऱयांच्या चिंतेत वाढ होत आहे.
जिह्यात यावर्षी नोव्हेंबर महिन्याच्या सुरूवातीलाच थंडीला सुरूवात झाली होती. त्यानंतर हळूहळू थंडीत वाढ झाली. दिवाळीच्या काळात तर जिह्यातील किमान तापमान 12 अंशापर्यत खाली आले होते. मात्र त्यानंतर वातावरणात बदल झाला. त्यामुळे किमान तापमान 20 अंशावर पोहोचले होते. थंडी कमी होऊन उकाडाही जाणवत होता. काही दिवस तापमान वाढले. पण, त्यानंतर किमान तापमान 15 अंशाच्या खाली आले. चार दिवसांपूर्वी तर साताऱयात 12.02 अंशापर्यंत तापमान उतरले होते. त्यामुळे थंडीचा कडाका पडला होता. अशी स्थिती एकच दिवस होती. मात्र त्यानंतर तापमान 17 अंशावर पोहोचले. तर मागील दोन दिवसांपासून किमान तापमान 18 अंशावर पोहोचले आहे. परिणामी थंडीचा जोर एकदम कमी झाला आहे. रविवारी सकाळपासून गारठा कमी झाला होता. दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. वातावरणात निउत्साही झाले होते. यांचा परिणाम शेतातील पिकांवर जास्त होऊ शकतो. यामुळे शेतकऱयांची चिंता वाढली आहे.








