प्रतिनिधी/ सातारा
कोरोनाच्या संकटात ही आपल्या लाडक्या बाप्पांच्या आगमनामुळे उत्साहाचे वातावरण गेले दहा दिवस होते. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत बाप्पांचे अगदी साधेपणाने विसर्जन करण्यात आले. सातारा शहरात मंगळवारी सकाळपासून सुरू झालेली विसर्जन प्रक्रिया सायंकाळी उशिरा पर्यंत सुरू होती. सातारा शहरातील मानाच्या गणपतींनी आपली परंपरा जोपासली. जिह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यात आले.
यावर्षी कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे आनंदाचा, उत्सवाचा गणेशोत्सवावर ही कोरोनाचे सावट होते. तरीही परंपरेनुसार शासनाचे नियम पाळून गणेश भक्तांनी बाप्पांची गेली दहा दिवस सेवा केली. दहा दिवस त्यांच्याकडे या कोरोनाला लवकर घेऊन जा अशी प्रार्थना केली जात होती. विसर्जनाचा शेवटचा दिवस असल्याने जिह्यातील प्रमुख शहरे, सर्व गावामध्ये लगबग दिसत होती. मंगळवारी सकाळपासून गणेश विसर्जनाला सुरुवात झाली. विसर्जन मिरवणुकीत दरवर्षी जसा गाजावाजा असायचा तसा काहीच नव्हता. गुलालाची उधळण नव्हती, ना कार्यकर्त्यांचा नाच नव्हता ना डीजे नव्हता, अतिशय शांततेत मिरवणुका पार पडल्या. सातारा शहरात मानाच्या गणपतींनी आपली परंपरा कायम राखली. सातारा शहरात पालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तळ्यात तर काहींनी संगममाहुली येथे विसर्जन केले. जिह्यात सुमारे साडे तीन हजार मंडळानी विसर्जन केले.
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी लावली होती भिरकीट
गणेश विसर्जन दरम्यान कोठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाला त्यांनी सूचना दिल्या होत्या. जिल्हा प्रशासनाचे नियोजन कसे केले आहे. याची प्रत्येक ठिकाणी जाऊन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली. सातारा, कराड, पाटण, वाई येथील पोलिसांचे त्यांनी कौतुक केले. कराड येथे त्यांच्या हस्ते विसर्जन करण्यात आले.








