प्रतिनिधी/ सातारा
मुंबई आणि पुण्यामध्ये दररोज वेगवेगळे रेकॉर्ड होत असल्याने गावी जाऊन चार दिवस छान राहू या विचाराने एक लाखाहून अधिक जण मूळ गावी सातारा जिह्यात आले आहेत. ते गावी आल्याने काही गावात क्वारंटाइनसाठी त्यांना ग्राम समितीच्या निर्णयानुसार त्यांना त्यांच्या घरात ठेवण्यात येते तर काही गावात त्यांना शाळेत रहावे लागते. जिह्यातील 3868 शाळांपैकी जिल्हा परिषदेच्या 90 टक्के शाळा या मुंबई-पुणेकरांनी हाऊसफुल्ल केल्या आहेत. जिह्यातील कोरोनाचा वाढत चाललेला आकडा पाहून शासनाकडून दि. 15 जूनला शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून त्यास पालकामधून विरोध होताना दिसत आहे. क्वारंटाइनसाठी दिलेल्या शाळा पुन्हा शिक्षणासाठी कशा वापरात आणणार अशी चर्चा सध्या जिह्यात सुरू आहे. शाळा सुरू करण्याच्या अनुषंगाने आज शिक्षण विभागाने तालुकानिहाय बैठका घेतल्याचे खात्रीपूर्वक वृत्त आहे.
कोरोना हा महाभयंकर आजार असल्याने त्याने आपले पाय जगात पसरले आहेत. पुण्या-मुंबईत तर दररोज वेगवेगळे रेकॉर्ड होत आहेत. तेथील बाधित आणि मृतांचे आकडे ऐकून काहीच्या काळजाला धडकी बसत आहे. त्यामुळे पुण्या मुंबईतले चाकरमानी आपल्या मूळ गावी परतत आहेत. गावात दोन दिवस सुखाचे मोकळे ढाकळे घालवू, शहरातल्या चार भिंतीत राहण्यापेक्षा गावी जाऊ असे म्हणून काहीही करून आपल्या गावी येत आहेत. जे कधी ही गावी येत नाहीत तेही गावी आल्याचे दिसत आहेत. मात्र, हे गावी येताना सोबत कोरोनाला पाव्हुणा घेऊन आले आहेत. शहरातून गावात पोहचल्यावर गावाच्या दक्षता कमिटीने तर काही गावात त्यांच्याबाबत सहानुभूतीचा विचार केला. त्यांना होम क्वारंटाइनचा तर काही गावांमध्ये गावाबाहेर असणाऱया शाळेत सोय केली. जिल्हा परिषदेच्या 90 टक्के शाळा अधिगृहित करण्यात आल्या आहेत. मुळात काही गावात तर शाळा ही एका किंवा दोन खोलीच्या आहेत. एखादे दुसरे कुटूंब राहू शकते. येणाऱयांची संख्या मोठी असल्याने शाळा हाऊसफुल्ल झाल्या आहेत. शाळेत वेगवेगळे रहाणे अपेक्षित असते मात्र, हे मुंबईकर तेथेही एकत्र असतात. त्यामुळे त्या क्वारंटाइन कक्षात एकाला लागण झाली की सगळ्यांना ओळ लागते. दरम्यान त्या शाळेत पाणी, शौचालय याची सुविधा असेल असे नाही. तसेच शाळेच्या परिसरात दररोज निर्जंतुककरण करणे आवश्यक असते. जिह्यात अधिकृत सव्वा लाख लोक बाहेरून आले आहेत. त्यातील 90 टक्के हे शाळेत असल्याने शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होण्याची भीती पालकामधून व्यक्त होत आहे. आज जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात 15 जूनला शाळा सुरू करण्याकरिता काय काय अडचणी येथील, उपाययोजना काय यावर बैठका घेण्यात आल्या आहे.मात्र, त्या बैठकीतला तपशील समजू शकला नाही.
ग्रामीण भागात कोरोन टाइनची अशी ही तऱहा
पुण्यामुंबईहुन आलेल्याना बाहेरच थांबवले जात आहे. सातारा तालुक्यातील एका गावात तर मुंबईहुन आलेल्या कुटूंबास त्यांच्याच घरात कोंडले असून बाहेरून कुलूप लावले आहे. लागेल ती वस्तू बाहेरून पुरवण्यात येत आहे. कोरेगाव तालुक्यातील एका गावात तर कोरोना कृती समितीने बाहेरून आलल्याची शाळेत सोय करण्यात आली आहे. शाळेत सुरुवातीला एकच युवक होता त्यानंतर एक महिला आली. त्या महिलेला त्याच शाळेत क्वारंटाइन करण्यासाठी गाव एक झाले तर काहींनी विरोध केला त्यामुळे ती युवकास अलग ठेवण्यात आले.
शासनाकडून 15 जूनला शाळा सुरू करण्याच्या चाचपणीला वाढू लागला विरोध