दहापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांना टाळे लावण्याचा विचार
रत्नागिरी / प्रतिनिधी
राज्यातील 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा विचार राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. राज्यात अशा 4 हजार 690 शाळा बंद होण्याची शक्यता असून त्यात सर्वाधिक 702 शाळा रत्नागिरी जिह्यातील आहेत. या शाळांबाबत सरकारने अहवाल मागवला असून तो लवकरच सादर केला जाणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांनी दिली आहे.
केंद्र सरकारने 2009 साली शिक्षण अधिकार अधिनियम जारी केला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने तो लागू करण्यात आला. विद्यार्थी संख्येनुसार शिक्षकांचे प्रमाण या कायद्यात ठरवून देण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणी वेगवेगळ्या टप्प्यांवर करण्यात येत आहे. महाराष्ट्रात सुरुवातीच्या टप्प्यात 5 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी शिक्षक संघटनांनी आक्षेप घेतले होते. परंतु त्याकडे सरकारने लक्ष दिले नाही. उलट निर्णयाचे समर्थन केले.
आता राज्य सरकारने त्यापुढचा टप्पा हाती घेताना 10 पेक्षा कमी पटाच्या शाळा बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहते. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आर्थिक काटकसर अत्यावश्यक बनल्याने हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. नवीन भरतीवर बंदी असल्याने असलेल्या शिक्षकांमध्ये शिक्षण व्यवस्था चालवण्यासाठी हा निर्णय अपरिहार्य असल्याचे सांगितले जात आहे. राज्यातील सर्व जिह्यांच्या शिक्षणाधिकाऱयांकडून शाळांविषयी माहिती मागवण्यात आली आहे. 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद झाल्यास तेथील मुलांना अन्य शाळेत पाठवण्यासाठी कोणती व्यवस्था करावी. ही व्यवस्था व्यवहार्य ठरेल काय? आदी मुद्यांवर माहिती मागवण्यात आली आहे.
राज्यात विविध जिह्याच्या 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची यादी शासनाने शिक्षणाधिकाऱयांना पाठवली असून त्यावर माहितीपूर्ण अहवाल पाठवण्याच्या सूचना केल्या आहेत. यात पुणे-478, रायगड-473, सिंधुदुर्ग-441, सातारा-370, कोल्हापूर-141, सांगली-77, ठाणे-72, पालघर-60, सोलापूरमधील 44 शाळांचा समावेश आहे.
बंद होऊ घातलेल्या सर्वाधिक 700 शाळा रत्नागिरी जिह्यात आहेत. यामध्ये कमी पटसंख्येच्या सर्वाधिक 131 शाळा शाळा खेड तालुक्यात असून त्यापाठोपाठ संगमेश्वर 102 शाळा आहेत. गुहागर तालुक्यात सर्वात कमी म्हणजे 41 शाळा 10 पटसंख्येच्या असून राजापूर-93, चिपळूण-92, दापोली-73, लांजा-64, रत्नागिरी-54, मंडणगड-50 याप्रमाणे शाळा बंद होण्याच्या यादीत आहेत.
शिक्षक संघटनांनी 10 पटाच्या खालच्या शाळा बंद करण्यास आतादेखील विरोध दर्शवला आहे. तथापि शिक्षक अतिरिक्त ठरून त्याला शेजारच्या शाळेत रिक्त पदावर समायोजित करून घेण्याचे सरकारी धोरण आहे. या धोरणाचा लाभ आपल्याला नेमका कशाप्रकारे मिळेल याचा विचार 10 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळेतील शिक्षकांनी सुरु केला आहे. त्यासाठी संघटनांकडे आपल्या म्हणण्याची नोंद अनेक शिक्षकांनी करण्यास सुरूवात केली आहे.
एका बाजूला कोरोना विरूध्द प्रशासकीय तसेच आरोग्य विभागाची धडक मोहीम सुरु असताना दुसऱया बाजूला सरकारने खर्च कपातीसाठी शाळा बंद करण्याचा उपयोग होवू शकेल असा विचार चालवला आहे. शाळा बंद करण्याचा आता निर्णय झाल्यास त्यावर टिकाकारांचे बळ कोरोनामुळे कमी होईल. लोकही सरकारी निर्णयाला सहकार्य करतील असे गणित मांडण्यात येत आहे.
लवकरच अहवाल देणार
दहा पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांची माहिती राज्यसरकारने मागवली आहे. आम्ही सर्व मुद्यांवर माहिती सरकारकडे देऊ. शाळा बंद करण्याविषयीचा निर्णय शासन पातळीवरून होईल, त्यानंतर तो लागून होईल. दरवर्षीच सरकारकडून अशी माहिती मागवली जात असते.
-निशादेवी वाघमोडे,
शिक्षणाधिकारी प्राथमिक, जि. प. रत्नागिरी
…ग्राफ तयार करावा
दहापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांची तालुकावार संख्या
खेड- 131
संगमेश्वर- 102
राजापूर-93
चिपळूण-92
दापोली-73
लांजा-64
रत्नागिरी-54
मंडणगड-50
गुहागर-41









